जवळा, मांदेली, बोंबील मुबलक.. पण भाव नाही, रायगडातील मच्छीमारांना सुक्या मासळीचा आर्थिक आधार

रायगड जिल्ह्यात सध्या मासेमारीचा हंगाम सुरू असून जवळा, मांदेली, बोंबील, बांगडा, माकुल, अंबाडा अशा विविध प्रकारची मासोळी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पण त्याचा खप फारसा नाही. योग्य तो दरदेखील बाजारपेठेत मिळत नाही. त्यामुळे शिल्लक असलेली मासोळी सुकवण्यासाठी कोळी महिलांची लगबग सुरू झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात या सुक्या मासोळीला चांगला भाव मिळत असल्याने मच्छीमारांनी त्याकडेच लक्ष केंद्रित केले आहे. रायगडातील मच्छीमारांना याच सुक्या मासळीचा आर्थिक आधार मिळणार आहे.

रायगडला मासळीची मोठी बाजारपेठ असून अंदाजे 4 हजार 993 लहान-मोठ्या नौकांमधून मासेमारी केली जाते. सुक्या मासळीची पावसाच्या तोंडावर दरवर्षी 30 ते 35 कोटी रुपयांची उलाढाल होते. अलिबाग तालुक्यातील कोळीवाडा, वरसोली समुद्रकिनारा, नवगाव, बोडणी, रेवस, आग्राव कोळीवाडा, मुरुड तालुक्यातील मुरुड कोळीवाडा, एकदरा, कोर्लई, बोर्ली, उरण तालुक्यातील करंजा, मोरा, बेलपाडा, श्रीवर्धनमध्ये दिवेआगर, श्रीवर्धन कोळीवाडा येथे मोठ्या प्रमाणात सुक्या मासळीचे उत्पादन केले जाते. त्यामुळे या तालुक्यामधील किनारपट्टीवर ठिकठिकाणी बांबूची कनाथ व ओटे तयार करण्यात आले आहेत.

एप्रिल, मे महिन्यातील दर

एप्रिल व मे महिन्यात सुकट प्रतिकिलो 350 ते 450 रुपये दराने विकली जात आहे तर वाकट्यांचे दर 500 ते 600 रुपये, आंबाड 400 ते 500 रुपये, मांदेली 300 रुपये, सुके बोंबील 400 ते 500 रुपये, माकुल्या 400 ते 600 रुपये, बांगडा 450 तर सुक्या कोळंबीचे सोडे 1 हजार 500 ते 2 हजार रुपये किलो दराने विकले जातात.

■ कनाथवर कोळी बांधवांनी मोठ्या संख्येने बोंबील, वाकटी, मांदेली, बांगडे वाळवण्यासाठी ठेवले आहेत, तर ठिकठिकाणी उभारलेल्या ओट्यांवर जवळा, करदी सुकट, सोडे, माकुल सुकवण्यासाठी पसरवलेले आहेत.

■ सध्या सुरू असलेले खारे वारे मासोळी सुकवण्यासाठी उपयुक्त असल्याने किनारपट्टी परिसरात पहाटे मासळी सुकवण्यासाठी तर सायंकाळी मासळी जमा करण्यासाठी कोळी महिलांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.