
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शनिवार, रविवार व इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या संधीचा फायदा घेत खासगी वाहतूकवाले अन् थेट दर्शनसाठी खासगी एजंट यांच्याकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असून, याकडे संबंधित प्रशासन विभाग दुर्लक्ष करत असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहेत. याकडे आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील सहावे ज्योतिर्लिंग असून येथे गुजरात, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी येत आहे. संबंधित भाविक दर्शनासाठी श्री क्षेत्र भीमाशंकरला येत असताना, त्यांना घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्याचे कर्मचारी भाविकांच्या गाड्या मंदिराच्या अलीकडे दोन किलोमीटर अंतर असलेल्या वाहनतळांवर गाड्या लावत आहे. तेथून पुढे जाण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने वाहनतळाच्या शेजारीच उभे खासगी वाहतूक करणारे भाविकांना मंदिर इधर से बहुत दूर है! असं सांगत ज्या राज्यातील भाविक आहे त्याप्रमाणे शंभर ते पाचशे रुपये प्रति व्यक्ती तिकीट घेत आहेत. तसेच एक दोन व्यक्ती असतील तर मोटारसायकलवर वाहतूक करणारे ट्रिपल सीट भाविकांना नेत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी एखाद्या भाविकाची गाडी बसस्थानकापर्यंत सोडली तर बसस्थानकासमोर पोलिसांची बॅरिकेड लावून उभे असलेले खासगी एजंट मंदिरापर्यंत गाडी सोडण्यासाठी व थेट दर्शनासाठी लहान चारचाकी गाडीचे चार ते पाच हजार रुपये घेत आहेत. व्हीआयपी गेटमधून मंदिराकडे जात असताना संबंधित गाडीची नोंद न घेता संबंधित अधिकारी, कर्मचारी भाविकांची गाडी सोडत आहेत. अशा पद्धतीने भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.
खासगी वाहतूकवाले व थेट दर्शनासाठी असलेले खासगी एजंट यांची मोठ्या प्रमाणात ओरड झाली की, ते आपला व्यवसाय एक-दोन दिवस बंद ठेवतात. अन् पुन्हा नवीन दरवाढीसह प्रशासनाच्या आशीर्वादाने पुन्हा व्यवसाय सुरू करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.