
विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता ओटीटीवरचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज होत आहे. ‘छावा’ पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात ओटीटीवर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या लोकांना सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहता आला नाही, त्यांच्यासाठी ओटीटी ही जणू पर्वणीच ठरणार आहे. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला ‘छावा’ आता दोन महिन्यांनंतर म्हणजेच 11 एप्रिल 2025 ला नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे, परंतु चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप डिजिटल रिलीजसंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ‘छावा’ चित्रपट हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली, तर रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई आणि अक्षय खन्ना यांनी मुघल शासक औरंगजेब याची भूमिका साकारली आहे.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विक्की कौशलच्या करीअरमधील हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची दमदार कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि चित्रपटातील सर्वच कलाकारांनी केलेला शानदार परफॉर्मन्सने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. चाहते आणि विरोधक अशा दोन्हींचे मन जिंकण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग केलेल्या ‘छावा’ने अवघ्या दोन दिवसांत वर्ल्डवाईड 100 कोटींचा गल्ला जमवला. ‘छावा’ने जगभरात मोठी कमाई केली असून या चित्रपटाने भल्याभल्या चित्रपटांना कमाईत मागे टाकले आहे.