मतदानाच्या दिवशी चांदिवलीत रोड शो काढला; मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन मिंधे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. लांडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार नसीम खान यांच्या मुख्य पोलिंग एजंटने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि लांडे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

इतर मतदारसंघांतील उमेदवार किंवा कोणतेही राजकीय नेते यांना स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर मतदारसंघांत मतदानाच्या दिवसापूर्वी 48 तास प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि लांडे यांच्याविरोधात कलम 171 व लोकप्रतिनिधी कायदा कलम 126 अन्वये एफआयआर दाखल करण्याचे निर्देश साकीनाका पोलीस ठाण्याला द्यावेत असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आज मतदान सुरू असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास काजूपाडा घास पंपाऊंड ते सेंट ज्यूड हायस्कूल भागात मुख्यमंत्री शिंदे यांनी रोड शो काढून लांडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.