नगरमध्ये कांद्याला मिळाला उच्चांकी 55 रुपयांचा भाव

ऐन गणेशोत्सवामध्ये शेतकऱ्यांना गणराया पावला आहे. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये आज गावरान कांद्याला तब्बल 55 रुपये किलोचा भाव मिळाला. गेल्या अनेक दिवसांतील हा उच्चांकी भाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याला समाधानकारक भाव मिळत आहे. अनेक लिलावांत कांदा 25 ते 30 रुपये किलो दराने विकला जात आहे. गुरुवारी (12 रोजी) झालेल्या लिलावात 1 नंबर कांद्याला 43 ते 45 रुपये किलोचा भाव मिळाला होता. आज लिलावासाठी नेप्ती कांदा मार्केटमध्ये 251 गाडय़ांमधून 50 हजार 232 कांदा गोण्यांची आवक झाली होती. लिलाव सुरू झाल्यानंतर उपबाजार आवारातील आडतदार ढाकणे ब्रदर्स यांचे आडतीवर चांगल्या प्रतीच्या 18 गोण्या कांद्याला उच्चांकी 55 रुपये किलो (5500 रुपये क्विंटल) भाव मिळाला. तर, 20 गोण्यांना 54 रुपये, 7 गोण्यांना 53 रुपये भाव मिळाला. इतर लिलावांत 1 नंबर कांद्याला 45 ते 52 रुपये, 2 नंबर कांद्याला 37 ते 45 रुपये, 3 नंबर कांद्याला 27 ते 37 रुपये, 4 नंबर कांद्याला 15 ते 27 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे. यावेळी नीलेश सातपुते, संजय काळे, सभापती भाऊसाहेब बोठे, रभाजी सूळ, सचिव अभय भिसे उपस्थित होते.