
हिंदुस्थानची अव्वल महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने अत्यंत रंगतदार लढतीत चीनच्या झू जिनरचा पराभव करून फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यात सातव्या फेरीअखेर आघाडीच्या स्थानावर झेप घेतली.
हडपसरमधील अमनोरा द फर्न येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत कोनेरू हम्पी आता 5.5 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून आधीच्या फेरीपर्यंत पहिल्या स्थानावर असलेली झू जिनर आणि सातव्या फेरीत मुनगुंतूल बॅट खुयाकवर विजय मिळवणारी दिव्या देशमुख या दोन खेळाडू प्रत्येकी 5गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. संपूर्ण राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आता केवळ दोन फेऱ्या बाकी असल्यामुळे हम्पी, झू जिनर व दिव्या देशमुख या तिघींमध्ये विजेतेपदसाठी चुरस रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदुस्थानच्या वैशाली रमेशबाबू व हरिका यांना आज बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्या विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत.
निकाल ः सातवी फेरी – व्हाईट व ब्लॅकनुसार ः सालिनोव्हा न्यूरघ्युन (3 गुण, बल्गेरिया) बरोबरी वि. मेलिया सॅलोम (2 गुण, जॉर्जिया); वैशाली रमेशबाबू (3 गुण, हिंदुस्थान) बरोबरी वि. एलिना पॅशलीनस्काया (2 गुण, पोलंड); कोनेरू हम्पी (5.5 गुण, हिंदुस्थान) वि.वि. झू जिनर (5 गुण,चीन); दिव्या देशमुख (5 गुण, हिंदुस्थान) वि.वि. मुनगुंतूल बॅट खुयाक (2 गुण, मंगोलिया); पोलिना शुव्हालोवा (4 गुण, रशिया) बरोबरी वि. हरिका द्रोणावल्ली (3.5 गुण, हिंदुस्थान).