फेरी बोट नदीत उलटली, 38 जणांना जलसमाधी; 100 हून अधिक लोक बेपत्ता

कांगोमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. फेरी बोट नदीत उलटल्याने 38 जणांना जलसमाधी मिळाली असून 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बुसरा नदीत शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली. आतापर्यंत 20 जणांना वाचवण्यात यश आल्याचे कळते.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त फेरी बोट काँगोच्या उत्तर-पूर्व भागातील इतर जहाजांच्या ताफ्याचाच एक भाग होती. या फेरीमधील प्रवासी प्रामुख्याने व्यापारी होते. नाताळच्या सणासाठी सर्वजण घरी परतत होते. मात्र तत्पूर्वीच ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले होते. यामुळे ओव्हरलोड झाल्याने बोट पाण्यात बुडाली. ही बोट इंजेंडे आणि लोलो मार्गे बोएंडेला जात होती. बोटीत 400 हून अधिक प्रवासी होते, असे एका स्थानिकाने सांगितले. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.