विनाहिजाब कॉन्सर्ट; गायिकेला अटक

ऑनलाइन कॉन्सर्टदरम्यान हिजाब न घातल्याप्रकरणी एका महिला गायिकेला इराणमध्ये अटक करण्यात आली. परस्तु अहमदी असे गायिकेचे नाव आहे. तिने 11 डिसेंबर रोजी कॉन्सर्टचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला होता. व्हिडीओमध्ये परस्तु अहमदी स्लीव्हलेस ड्रेस घालून गाणे म्हणत होती. व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर तिच्याविरोधात गुरुवारी न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आणि शनिवारी तिला अटक झाली.

परस्तु अहमदीच्या व्यतिरिक्त व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या 4 संगीतकारांपैकी दोन जणांना अटक करण्यात आली. सोहेल फगिह नासिरी आणि एहसान बेरागदर अशी अटक करण्यात आलेल्या दोन संगीतकारांची नावे आहेत. दोघांना राजधानी तेहरान येथून अटक करण्यात आली. यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करण्याच्या एक दिवस आधी गायिका परस्तुने सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘मी ती परस्तु मुलगी आहे, जिला माझ्या आवडत्या लोकांसाठी गाण्याची इच्छा आहे. मी या अधिकाराकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मला ज्या भूमीवर खूप प्रेम आहे त्यासाठी मी गातेय.’