गर्भवती महिलेसाठी पोलीस बनले देवदूत

गर्भवती महिलेसाठी डोंगरी पोलिसांचे ‘निर्भया’ पथक हे देवदूत बनले. प्रसूतीसाठी जात असलेल्या महिलेला अचानक वेदना सुरू झाल्या. महिला पोलिसांनी बॅनर आणि ताडपत्री लावून महिलेला कव्हर करून तिची प्रसूती केली. महिलेवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंगरी पोलिसांच्या निर्भया पथकाने कौतुक होत आहे.

मुंबई पोलीस हे नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावत असतात. जखमी असो वा रस्त्यात जखमी अवस्थेत असणाऱ्या बेघरांनादेखील रुग्णालयात नेऊन उपचार करतात. खाकी वर्दी ही नेहमीच मदतीला धावते. अशीच एक घटना आज दक्षिण मुंबईच्या डोंगरी परिसरात घडली. डोंगरीचा चार नळ परिसर हा नेहमी गजबलेला असतो. आज सकाळी डोंगरी पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्ना खंडेलवाल, गुजर, जाधव, पाटील, राऊत, फड, सोनावणे हे चार नळ परिसरात गस्त करत होते. तेव्हा एक महिला प्रसूतीसाठी जात होती. रस्त्यावर एक महिला ही अर्धवट प्रसूती झाल्याचे खंडेलवाल यांना दिसले. त्यानंतर खंडेलवाल आणि पथक तेथे गेले.

सकाळी पाऊस पडत होता. अशा अवस्थेत पोलिसांनी बॅनर आणि ताडपत्री लावून महिलेला कव्हर केले. एका महिलेच्या मदतीने तिची प्रसूती केली. महिलेने मुलाला जन्म दिला. महिलेचा  रक्तस्राव अधिक झाल्याने पोलिसांनी मदतीसाठी रुग्णवाहिकेला फोन केला. पण रुग्णवाहिका वेळेत आली नाही. तेव्हा खंडेलवाल यांच्या पथकाने महिलेला पोलिसांच्या गाडीतून जे. जे. रुग्णालयात दाखल केले. महिलेवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही महिला मुंब्रा येथे राहते. ती आज सॅण्डहर्स्ट रोड स्थानकातून प्रसूतीसाठी पायी जे जे. रुग्णालयात जात होती.