अनंत चतुर्दशीच्या दिवशी गस्तीवर असलेल्या महिला पोलीसाचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. हरीश मांडवीकर, दीपक पांडे, सुभाष चौधरी आणि राजहंस कोकिसरेकर अशी त्या चौघांची नावे आहेत. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती. जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. वाहतुकीच्या दृष्टीने मार्गात बदल करण्यात आले होते. मंगळवारी मांडवीकर हा कांदिवलीच्या धनुकरवाडी येथे आला होता. तो प्रतिबंधित मार्गाने विसर्जनस्थळी जात होता. तेव्हा त्याला महिला पोलिसाने तिथून जाऊ नये असे सांगितले. पर्यायी मार्गाने जावे असे महिला पोलीसने मांडवीकरला सांगितले. तेव्हा मांडवीकरने महिला पोलिसाला धक्काबुकी केली. हा प्रकार तेथे गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आला. मांडवीकरचे साथीदार हे त्यात सामील झाले. पोलिसांशी बाचाबाची सुरु झाली. त्यानंतर पोलिसांनी मांडवीकर आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. महिला पोलीसने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद करून त्या चौघाना अटक केली. अटक करून त्या चौघांना आज न्यायालयात हजर केले होते. त्या चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मांडवीकरविरोधात मटकाकिंग सुरेश भगत याच्या हत्येसह खंडणी, प्राणघातक हल्ला आणि खुनाचे असे 10 गुन्हे दाखल आहेत.