निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत मोठा घोळ; 138 मुलांचा बाप मुन्ना कुमार!

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आले होते. अनेक ठिकाणी मतदारांचे नाव कापण्यात आले होते, तर काही ठिकाणी नवीन नावांचा समावेश करण्यात आला होता. असाच प्रकार बिहारमध्ये उघडकीस आला असून एका व्यक्ती तब्बल 138 जणांचा बाप बनवण्यात आले आहे.

तिरहूत पदवीधर पोटनिवडणुकीची मतदार यादी पाहून सर्वच हैराण झाले आहेत. यात हिंदू, मुसलमान समुदायाच्या बहुसंख्य लोकांच्या वडिलांचे नाव मुन्ना कुमार असे लिहिण्यात आले आहे. बुथ क्रमांक 54 वर हा प्रकार घडला असून येथे 724 मतदार आहेत. या यादीतील 138 जणांच्या नावापुढे वडिलांचे नाव मुन्ना कुमार असे लिहिण्यात आलेले आहे. त्यामुळे मतदारांसह उमेदवार आणि अधिकाऱ्यांनीही डोक्याला हात लावला.

तिरहूत पोटनिवडणुकीची मतदार यादी नुकतीच समोर आली. यात मुन्ना कुमार यांचे 138 मुलं असल्याचे दाखवण्यात आले. येथे 5 डिसेंबर रोजी मतदान झाले असून 9 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 86 बूथ बनवण्यात आले.

जिल्ह्यात 45031 पुरुष, 22511 महिला आणि 5 तृतियपंथी मतदार आहेत. औराई बीडीओ कार्यालय बुथ क्रमांक 54 येथील 19 टक्के मतदारांच्या वडिलांचे नाव मुन्ना कुमार लिहिण्यात आलेले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मतदारांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे आपल्या मतदानाचा हक्क हिरावला तर जाणार नाही अशी चिंता मतदारांना भेडसावत होती.

मिळालेल्या माहितीनुसार कॉम्प्युटरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला. ज्या मतदारांच्या नावाचे पहिले अक्षर एमने सुरु होते त्यांच्या नावापुढे युनिकोड फॉन्टमुळे मुन्ना कुमार हे नाव आले. ही तांत्रिक चूक असल्याचे निवडणूक अधिकारी सरवणन एम यांनी सांगितले. लवकर या यादीत सुधारणा करण्यात येईल आणि मतदारांचा हक्क अबाधित ठेवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.