नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, दोन जण ठार एक जण गंभीर जखमी

नगर – मनमाड राज्य मार्गावर हुंडाई कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. येवला तालुक्यातील आंबेवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

आकाश रमेश पवार, निलेश दगु शेवाळे असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नगर – मनमाड राज्य मार्गावर येवला तालुक्यातील आंबेवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास हुंडाई कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे हुंडाई कार सुमारे 30 ते 40 फूट लांब रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातग्रस्त गाडीचा पत्रा कापून गंभीर जखमी व मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर शुभम गंगाधर पानमळे हा चालक गंभीर जखमी झाला आहे. मित्राला मनमाड रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी जात असताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.