हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉनची निवृत्ती

सतत दुखापतग्रस्त असणाऱ्या हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉनने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विजय हजारे करंडकातील झारखंड संघाच्या मोहिमेच्या समाप्तीनंतर ऍरॉनने क्रिकेट विश्वाला रामराम करण्याचा निर्णय घेतला. 34 वर्षीय ऍरॉनने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो हिंदुस्थानसाठी 9 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळला. गेल्या वर्षी त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आज निवृत्तीबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना ऍरॉन म्हणाला, ‘गेल्या 20 वर्षांपासून मी वेगवान गोलंदाजीसाठी समर्पित आहे.  आज पूर्ण कृतज्ञतेने मी अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्त होतोय. गेल्या काही वर्षांत मी कारकीर्दीला धोकादायक असलेल्या अनेक दुखापतींमधून सावरण्यासाठी कठोर परिश्रम केले. पुनः पुन्हा पुनरागमनही केले आणि यासाठी मी माझे फिजिओ, प्रशिक्षक आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षकांचे आभार मानतो. आता मला माझ्या आयुष्यातील छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे.