पदार्पणवीराचा विक्रमवीराच्या कारकीर्दीला सलाम! अ‍ॅटकिन्सनने पदार्पणातच 12 विकेट घेत अ‍ॅण्डरसनला दिला निरोप

वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सनने पदार्पणातच 106 धावांत 12 विकेट घेण्याचा पराक्रम करत जेम्स अ‍ॅण्डरसनच्या विक्रमी कारकीर्दीला संस्मरणीय निरोप दिला. इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे विंडीजचा पहिल्या कसोटीच्या तिसऱया दिवशीच दारुण पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. इंग्लंडने विंडीजचा दुसरा डावही 136 धावांत गुंडाळला आणि डाव आणि 114 धावांचा महाविजय नोंदविला.

गुरुवारीच इंग्लंडने विंडीजची 6 बाद 79 अशी दुर्दशा करत आपला मोठा विजय निश्चित केला होता. त्यानंतर आज तिसऱया दिवशी पहिल्या सत्रात तासाभरात विंडीजचा डाव संपला. ऍटकिन्सनने तळाच्या तिन्ही फलंदाजांना बाद करत पदार्पणातच दोन्ही डावांत पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. गुदाकेश मोतीने 5 चौकारांसह नाबाद 31 धावा करत विंडीजचा पराभव काही काळ लांबवला. तो नाबाद राहिला. गुरुवारच्या धावसंख्येत 57 धावांची भर घालत विंडीजला आणखी एका दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

पदार्पणातच अॅटकिन्सनचा धमाका
तब्बल 21 वर्षांपासून इंग्लंड क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा वेगवान गोलंदाज जेम्स ऍण्डरसनचा निरोपाचा कसोटी सामना पदार्पणवीर गस अॅटकिन्सनने गाजवला. एकीकडे अॅण्डरसनची कारकीर्द अस्ताला जात असताना गस अॅटकिन्सनच्या वेगवान गोलंदाजीचा उदय झाला. पहिल्या डावात 7 विकेट टिपणाऱया अॅटकिन्सनने दुसऱया डावातही 61 धावांत 5 विकेट टिपत आपल्या हीरोला अनोखी विकेटवंदना दिली. अॅटकिन्सनच्या विक्रमी कामगिरीने दिलेल्या निरोपामुळे अॅण्डरसन अक्षरशः भारावून गेला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

अॅण्डरसनच्या कारकीर्दीला सलाम
अॅण्डरसनने काही दिवसांपूर्वीच विंडीजविरुद्धचा पहिला सामना आपला निरोपाचा सामना असेल, अशी घोषणा केली होती. अॅण्डरसनच्या भव्य कारकीर्दीचा शेवट इंग्लंडच्या जोरदार कामगिरीमुळे गोड झाला. 2003 साली पदार्पण केलेल्या अॅण्डरसनने इंग्लंडकडून लॉर्ड्सवर विंडीजविरुद्ध अखेरचा सामना खेळला. तिसऱया दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी अॅण्डरसनला इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. त्यानंतर सामना पहिल्याच सत्रात संपला. अॅण्डरसन हा कसोटी इतिहासात 704 विकेट घेणारा एकमेव वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापेक्षा अधिक विकेट फक्त मुरलीधरन आणि शेन वॉर्न या फिरकीवीरांनी टिपले आहेत.

हजार विकेटचे स्वप्न अधुरे राहिले
अॅण्डरसनने 2003 साली इंग्लंडकडून पदार्पण केले होते. गेल्या 21 वर्षांपासून तो इंग्लंड क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहे. ऍण्डरसनने लॉर्ड्सवर वेस्ट इंडीजविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात 4 विकेट्स घेत कसोटीत 188 सामन्यांत 704 विकेट्ससह कारकीर्दीची अखेर केली. त्याने वन डेतही 194 सामन्यांत 269 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 19 आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 18 विकेट्स घेत त्याने 991 विकेट टिपल्या आहेत. मात्र त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत एक हजार विकेटचे स्वप्न 9 विकेट्सनी अधुरेच राहिले.

अॅण्डरसनचे 40 हजार चेंडू
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यातील दुसऱया डावामध्ये जेम्सने एका अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. ऍण्डरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 40 हजार चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर कसोटीत 40 हजार चेंडू टाकण्याचा विक्रम करणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी तीन गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती ते सर्व फिरकीपटू होते. मुथय्या मुरलीधरन 44,039 चेंडू, अनिल कुंबळे 40,850 चेंडू, शेन वॉर्न 40,705 चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे.