आप- काँग्रेस एकत्र लढले असते तर दिल्लीचे निकाल वेगळे दिसले असते; फारुख अब्दुल्ला यांचे मत

दिल्ली विधानसभेचे निकाल धक्कादायक आहेत. या निकालाची देशभरात चर्चा होत आहे. त्याचसह ईव्हीएमच्या विसार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच भाजपने मदारयादीत केलेल्या महाघोटाळ्याची आणि वाढवलेल्या बोगस मतदानाचीही चर्चा होत आहे. आता दिल्ली निकालाबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. दिल्ली निवडणुकीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळे दिसले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

इंडिया आघाडीत एकीची भावना कायम आहे. मात्र, कधीकधी आपण चुका करतो. दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली असती तर निकाल वेगळा असता. काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडी का झाली नाही, हे आपल्याला माहित नाही. मात्र, आता या मुद्द्यावर इंडिया आघाडीत चर्चा करण्यात येईल. तसेच आघाडीतील एकी टिकवण्यासाठी योग्य ते निर्णय घेण्यात येतील, असेही अब्दुल्ला यांनी सांगितले.

इंडिया आघाडीचे उद्दिष्ट व्यापक आहे. ही आघाडी फक्त निवडणुकीसाठी नाही, तर देशाचे आणि त्याच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आहे. जनतेत निर्माण झालेला द्वेष संपवण्यासाठी ही आघाडी आवश्यक आहे. आघाडी संविधानाचे रक्षण करेल आणि देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.