
शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी डिसेंबर 2026पर्यंत शेतकऱयांना वाट पहावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे संकेत आज वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिले.
राज्य सरकारने शेतकऱयांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. शेतीसाठी 12 तास विजेची मागणी होती. यादृष्टीने प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून डिसेंबर 2026पर्यंत 80 टक्के शेतकऱयांना 365 दिवस दिवसाला 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पाच वर्षांत वीज बिल कमी
राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बिल दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरू केली आहे. येत्या पाच वर्षांत राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होणार आहे. 300 युनीटपर्यंत वीज वापरणाऱया मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जे अंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.