शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणा ऱ्या मोदी सरकारला सळो की पळो करण्यासाठी शेतकरी संघटनांची पुढील रणनीती ठरली आहे. उद्या, 16 डिसेंबर रोजी पंजाब सोडून संपूर्ण देशात ट्रक्टर मार्च काढण्यात येणार असून 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत पंजाब आणि हरयाणासह लागून असलेल्या इतर राज्यांमध्ये ठिकठिकाणी रेल रोको करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर यांनी वार्ताहारांना दिली.
ठिकठिकाणी रेल रोको करा, हजारोंच्या संख्येने जमा होऊन जोरदार निदर्शने करा, असे आवाहन सरवन सिंह पंधेर यांनी केले आहे.
आपल्या देशात 50 टक्के लोक शेती-व्यवसायाशी जोडलेले असून त्यांचा आवाज दाबता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) संघटनेचे प्रमुख जगजीत सिंह डल्लेवाल खनौरी बॉर्डरवर आमरण उपोषणासाठी बसले असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे हे संपूर्ण देश पाहत आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांचे उपोषण सुरू राहणार असून आंदोलन आणखी तीव्र होत जाणार असल्याचा इशारा सरवन सिंह पंधेर यांनी दिला आहे. दरम्यान, रेल रोकोमुळे देशभरातील रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून याचा फटका सर्वसामान्यांना बसू शकतो.
देशात आणीबाणी; पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा – विनेश फोगाट
देशात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली असून पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनप्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस आमदार विनेश फोगाट यांनी केली आहे. विनेश फोगाट यांनी आज खनौरी बॉर्डर येथे जाऊन आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. त्याचबरोबर देशभरातील शेतक ऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. जगजीत सिंग डल्लेवाल यांची भेट घेतल्यानंतर फोगाट यांनी वार्ताहारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठमोठी भाषणे ठोकतात. त्यांनी संसदेतही भाषण केले. परंतु नुसतेच भाषण देण्यापेक्षा त्यांनी कृती करावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ठोस तोडगा काढावा, अशी मागणी फोगाट यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून आज मोठी घोषणा?
शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे आणि शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांची प्रकृती खालावत चालल्याचे दिसताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कृषिमंत्री शिवराज सिंह यांची शनिवारी बैठक झाली. बैठकीत मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत माहिती घेतली. यावेळी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयलही उपस्थित होते. या बैठकीची शेतकऱ्यांमध्ये चर्चा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकरी आंदोलनाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता प्रसारमाध्यमांमधून व्यक्त केली जात आहे.
सरकारला सत्तेची धुंदी
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी शेतकऱ्यांच्या वतीने संसदेत आवाज उठवणार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना तसे आश्वासन दिल्याचे सरवन सिंह पंधेर म्हणाले. संसदेत संविधानावर चर्चा सुरू आहे, परंतु शेतक ऱ्यांच्या मागण्यांबद्दल कुणीच काही बोलत नाही, असा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी कुठला कायदा लागू होतो हे आम्हाला पाहायचेय. 101 शेतकऱ्यांचा जथा देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोका कसा बनू शकतो, असा सवालही त्यांनी केला. सरकारला सत्तेची धुंदी चढली असून संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा आवाज पोहोचत आहे, परंतु सरकारच्या कानापर्यंत जात नाही, असा सणसणीत टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.
संयुक्त किसान मोर्चाने आंदोलनात सक्रिय व्हावे – पंधेर
पंजाबमधील शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर यांनी आज संयुक्त किसान मोर्चाने पंजाब-हरयाणा बॉर्डरवर सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पत्राद्वारे केले. संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिपैत यांनी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी आणि संघर्ष उभा करावा तसेच पेंद्राने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली होती. त्यानंतर सरवन सिंह पंधेर यांनी त्यांना पत्र पाठवून शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
मोदी सरकारचा चर्चेस पुन्हा नकार
शंभू आणि खनौरी बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात गेल्या 20 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या जगजीत सिंह डल्लेवाल यांची आज केंद्रीय गृह विभागाचे संचालक मयंक मिश्रा यांनी भेट घेतली. यावेळी पोलीस महानिरीक्षक गौरव यादव यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल पुन्हा माहिती घेतली, परंतु पेंद्राच्या वतीने पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर चर्चेस नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने डल्लेवाल यांची आरोग्य तासणी करण्याचे तसेच डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मयंक मिश्रा आणि गौरव यादव यांनी त्यांची भेट घेतली.