
शेतमालास किमान आधारभूत किंमत (एमएसपी), कर्जमाफी, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी शंभु- खनौरी सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी आता दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहेत. शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी सरकार चर्चेबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप करत शेतकऱयांच्या मागण्यांबाबत कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचे ते म्हणाले.
शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर म्हणाले, शेतक-यांच्या न्याय मागण्यांसाठी सुरु केलेल्या आंदोलनाला उद्या 300 दिवस पूर्ण होत आहेत. उद्या दुपारी 12 वाजता 101 शेतकऱयांचा समूह दिल्लीच्या दिशेने कूच करेल. तसेच, सरकारकडून अद्याप चर्चेचा प्रस्ताव आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, ‘देशाचा विकास होत असल्याचे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मात्र विकासाचे निकष लावून शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे.’
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
- पिकांसाठी एमएसपीवर कायदेशीर हमी
- शेतकरी कर्जमाफी
- कृषी क्षेत्रात कंत्राटी शेतीची पद्धत नको
- शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन
- वीजदरात वाढ न करणे
- मागील आंदोलनातील पोलीस गुन्हे मागे घेणे
- 2021 च्या लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय
- भूसंपादन कायदा, 2013 ची पुनर्स्थापना
- 2020-21च्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात यावी.