अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर अवकळा; कांदा, मका, ज्वारीच्या पिकांचे नुकसान

कोकण, विदर्भासह मराठवाडय़ाला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपले. कांदा, काढणीला आलेला गहू, द्राक्ष, आंबा, काजू, हरभरा, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नसल्याचे चित्र असून त्यांच्यावर नैराश्याची अवकळा पसरली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्याची पोतीही भिजल्याने अन्नधान्याची मोठय़ा प्रमाणावर नासाडी होण्याची भीती आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारीही राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

नाशिकजवळील माडसांगवी, शिंदे आणि पळसेत बुधवारी तर मालेगावाच्या चिंचवे आणि इतर परिसरात आज गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने झोडल्याने तब्बल 1300 हेक्टरवरील डाळिंब, कांद्यासह काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नाशिकजवळील दारणा नदीकाठच्या सामनगाव, शिंदे, पळसे या गावांना गेल्या दोन दिवसांपासून पाऊस आणि गारपीटीने झोडपले. नंदुरबार, नाशिक, अहिल्या नगर, नागपूर, वर्धा, धुळे, बुलढाणा या जह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्टय़ातील गंगापूर, ठाणेपाडा या परिसरात शेतीचे मोठे नुकसान झाले.

n रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वरात तुरळक तर सिंधुदुर्गातील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, देवगड, वेंगुर्ले आणि कणकवलीत मुसळधार अवकाळी पाऊस झाला.

n मार्च महिन्यातील कडक उन्हामुळे पैरी करपून गळती झाली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर आंब्याचे नुकसान झाले. आता उरलासुरला आंबा तरी एप्रिल महिन्यात बाजारात विकता येईल अशी आशा आंबा बागायतदारांना होती. परंतु अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे पंबरडे मोडल्याचे चित्र आहे.

विदर्भात वीज पडून दोघांचा मृत्यू

भंडारा जिह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मनिषा पुष्पतोडे (25) आणि प्रमोद नागपरे(45) अशी या मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. दुपारच्या सुमारास शेतावर काम करत असताना वीज कोसळून या दोघांचा मृत्यू झाला.

चार तालुक्यांतील पिके आडवी

दोन दिवसांच्या पावसाने सटाणा, नाशिक, दिंडोरी, कळवण या चार तालुक्यांतील 1 हजार 300 हेक्टरमधील पिके अक्षरशः आडवी झाली. 1 हजार 175 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, 60 हेक्टरवरील भाजीपाला, 19 हेक्टरवरील डाळिंब आणि द्राक्ष तर 0.60 हेक्टरवीरल आंब्याचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले यांनी दिली. दरम्यान, नाशिक येथील स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांच्या दरात मोठी घसरण झाली असून 60 ते 70 रुपये किलोचा दर आता 40 ते 60 रुपयांपर्यंत घसरला आहे.

सिंधुदुर्गात आंबा, काजू संकटात

सिंधुदुर्गात सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, देवगड, कणकवली येथे विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे आंबा, काजू, कोकम ही पिके संकटात सापडली आहेत. संगमेश्वर तालुक्यात देवळे, चाफवली, मेघी, दाभोळे, चोरवणे, करंजारी परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले.