भातविक्रीसाठी शेतकऱ्यांना कुडकुडत काढावी लागते रात्र, मुरबाडमध्ये खरेदी-विक्री संघाच्या भोंगळ कारभाराचा फटका

शेतात काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी भात पिकवला. पण अवकाळी पावसाने या भाताची अक्षरशः माती करून टाकली. उरलासुरला भात विकण्यासाठीदेखील मुरबाडमधील शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. खरेदी-विक्री संघाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली. खरेदी-विक्री प्रक्रिया सुरळीत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून पदाधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर बाचाबाचीही झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शहापूर, मुरबाड तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात भाताचे पीक प्रामुख्याने घेण्यात येते. निसर्गाशी मुकाबला करून कसे बसे हे पीक हाता-तोंडाशी आले असतानाच यावर्षी अवकाळीने घात केला. शेतात पाणी साचल्यामुळे भात सडला. उरलेसुरले धान्य कुटुंबासाठी घरात ठेवून उर्वरित भात विकण्यासाठी मुरबाडमधील शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. सरकारच्या खरेदी-विक्री संघामार्फत हा भात विकत घेण्यात येतो. त्यासाठी शहापूर व मुरबाड तालुक्यात खरेदी-विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

ज्या शेतकऱ्यांना भात विकायचा आहे त्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. तसेच खरेदी-विक्री संघामार्फत टोकन दिले जाते. मुरबाडमधील भगवान भालेराव (विढे), बाळकृष्ण हरड (नारिवली), पुंडलिक हरणे (केदुर्ली) यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी भात खरेदीसाठी टोकन घेतले. मात्र या शेतकऱ्यांचा भात वेळेत न घेतल्यामुळे त्यांना मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात कडाक्याच्या थंडीमध्ये मुक्काम करावा लागत आहे. संपूर्ण रात्र या शेतकऱ्यांनी जागून काढली.

प्रक्रिया सोपी व जलद करा

खरेदी-विक्री केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. काट्यावर वजन करणे, त्याची नोंद ठेवणे या कामासाठी बराचसा वेळ लागतो. त्यामुळे मुरबाडमधील अनेक शेतकऱ्यांची पदाधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर बाचाबाची झाली. व्यापाऱ्यांना टोकन दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र संताप निर्माण झाला आहे. या बाचाबाचीमुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. भात खरेदी-विक्रीची प्रक्रिया सोपी व जलदगतीने करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.