शेतकरी पुन्हा दिल्लीवर धडक देण्याच्या तयारीत; शंभू सीमेकडे निघाले शेकडो ट्रॅक्टर, सोबत सहा महिन्यांचे रेशन

किमान हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 153 दिवसांनी पुन्हा दिल्लीवर धडक मारण्याची तयारी केली आहे. दिल्लीवर हल्लाबोल करण्यासाठी हे शेतकरी गावागावांतून ट्रक्टर घेऊन निघाले असून त्यांनी सोबत सहा महिन्यांचा शिधाही घेतला आहे.

पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार हरयाणा सरकारकडून शंभू सीमेवरील अडथळे दूर होण्याची शेतकरी वाट पाहात आहेत. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी गावागावांत बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र, हरयाणा सरकारने शंभू सीमा उघडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. चंदिगडमधील बैठकीनंतर शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल म्हणाले की, शंभू सीमा उघडताच आम्ही दिल्लीकडे रवाना होऊ.

पोलिसांचा कडक कारवाईचा इशारा

नवदीप सिंग या आंदोलकाच्या सुटकेसाठी शेतकऱ्यांनी उद्या आणि परवा अंबाला एसपी कार्यालयाला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. मात्र, घेराव घालण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा अंबाला पोलिसांनी दिला आहे. मार्चमध्ये नवदीपला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर दंगल आणि खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत. जिह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

ट्रक्टर गोळा होऊ लागले

पंजाबमधील अनेक जिह्यांतील शेतकऱ्यांचे गट ट्रक्टर-ट्रॉलींमधून जिंदला लागून असलेल्या खानौरी सीमेवर आणि अंबालाला लागून असलेल्या शंभू सीमेवर पोहोचू लागले आहेत. दिल्ल्लीला निघालेल्या या ट्रक्टर-ट्रॉलींमध्ये सहा महिन्यांचे रेशन आहे. शंभू सीमेवर 1000 हून अधिक ट्रॉलीमध्ये 3000 वर शेतकरी आहेत, तर खनौरी येथे 400 ट्रॉली आहेत. भटिंडा आणि परिसरातील 500 शेतकरी मंगळवारी सकाळी खनौरीकडे रवाना होणार आहेत.

हरयाणा सरकार सुप्रीम कोर्टात

शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी शंभू सीमेवर 8 स्तरांचे  बॅरिकेडिंग उभारण्यात आले होते. ते सध्या हटवले जाणार नाही. 10 जुलै रोजी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने 7 दिवसांच्या आत ही सीमा खुली करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हरयाणा सरकारने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.