Farmers Protest – शंभू बॉर्डरवर झटापटीत 15 आंदोलक जखमी, मोदी सरकारला शेतकऱ्यांचा 2 दिवसांचा अल्टिमेटम

पंजाब आणि हरयाणा सीमेवर शंभू बॉर्डर येथे 101 शेतकऱ्यांच्या एका जथ्थ्याने दिल्लीच्या दिशेने कूच केले. शेतकऱ्यांचा हा मोर्चा पुढे काही अंतरावरच पोलिसांनी रोखला. यावेळी सुरक्षा दलाचे जवान आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात 15 शेतकरी जखमी झाले. त्यापैकी 8 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर शेतकऱ्यांनी दिल्ली कूच स्थगित केले. बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

आम्हाला कृषीमंत्र्यांशी चर्चा करायची आहे. केंद्राशी चर्चा करण्यासाठी आम्ही आंदोलन थांबवले आहे. आता आम्ही 8 डिसेंबरला म्हणजे रविवारी दिल्लीसाठी कूच करू. आमच्याशी चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. त्यामुळे आम्ही हा वेळ घेतला आहे. शेतकऱ्यांना कोणाशी चर्चा करायची आहे? असे आम्हाला विचारण्यात आले. आम्हाला कृषीमत्र्यांशी चर्चा करायची आहे. तसेच पंजाबमध्ये आम्ही भाजपला विरोध करू आणि भाजप नेत्यांना काळे झेंडे दाखवू, असे शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. यात 15 शेतकरी जखमी झाले. तर 8 शेतकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरयाणा पोलिसांनी फोडलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्यामुळे पाच ते सहा आंदोलक शेतकरी जखमी झाले, असे पंधेर म्हणाले. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांच्यातील बैठकीनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असे शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर म्हणाले.