
बीकेयू अर्थात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना आज अलिगढ पोलिसांनी अटक केली. ते ग्रेटर नोएडा येथे शेतकरी नेत्यांच्या बैठकीसाठी जात होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱयांना रोखून धरले. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱयांमध्ये बाचाबाची झाली, त्यामुळे अनेक शेतकऱयांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी टिकैत यांना टप्पल पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, शेतकऱयांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर लखनऊपर्यंत ट्रक्टर मोर्चा काढण्यात येईल. आता आरपारची लढाई होईल, असा इशारा टिपैत यांनी दिला आहे.
शेतकरी संघटनांच्या प्रवक्त्याने पोलिसांशी संपर्क साधला असता टिकैत यांना ताब्यात घेण्यात आले आहे, परंतु अटक करण्यात आलेली नाही, असे उत्तर अलीगढ पोलिसांनी दिले. पोलीस शेतकऱयांना नोएडा येथील गौतम बुद्ध नगर येथे जाण्यापासून रोखत आहेत आणि त्यांना बळजबरीने घरांमध्येच बसवत आहेत, असा आरोप टिकैत यांनी केला आहे. त्याचबरोबर ते आम्हाला किती काळ असे डांबून ठेवू शकतात. जर पोलिसांनी आम्हाला अशा प्रकारे नजरपैदेत ठेवले तर ते आंदोलकांशी कसे बोलतील, कुणाशी वाटाघाटी करतील, असा सवालही टिकैत यांनी केला आहे.
शेतकरी आणखी आक्रमक होतील
पोलीस अशा प्रकारेच शेतकरी नेते, आंदोलकांशी वागणार असतील तर शेतकरी आणखी आक्रमक होतील, असा इशाराही शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. शेतकऱयांच्या मागण्यांप्रकरणी सरकार तोडगा काढत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी तसेच सरकारपुढे बाजू मांडण्यासाठी ग्रेटर नोएडा येथील झीरो पॉईंटवर उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडील जिह्यांमधील शेतकरी संघटनांनी, शेतकऱयांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज सर्वजण भेटणार होते. शेतकरी संघटनांनी आज मोर्चा काढत सरकारविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत राकेश टिकैत यांना ताब्यात घेतले.
123 शेतकऱ्यांना 16 तासांनी सोडले
पोलिसांनी मंगळवारी तब्बल 123 शेतकऱयांना 10 बसमध्ये कोंबून नोएडातील लुक्सर कारागृहात नेले होते. त्यानंतर आज तब्बल 16 तासांनी सर्व शेतकऱयांना सोडण्यात आले. कारागृहातून सर्व शेतकरी थेट यमुना एक्स्प्रेस वे येथील झीरो पॉईंटवर पोहोचले. यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत महापंचायत सुरू होती. शेकडो शेतकऱयांनी कारागृहातून बाहेर आलेल्या शेतकऱयांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, सात दिवसांत मुख्य सचिवांसोबत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱयांनी दिले होते, परंतु त्यांनी शेतकऱयांना फसवले. उलट शेतकऱयांनाच पकडले, अशा शब्दांत शेतकऱयांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.