केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसंदर्भातील धोरणांविरोधात शेतकरी आक्रमक झाला आहे. नोएडातील हजारो शेतकऱ्यांनी आज दिल्लीकडे मोर्चा वळवला. यावेळी पोलिसांनी त्यांना दलित प्रेरणा स्थळ येथे अडवले. यानंतर शेतकरी आणि प्रशासन यांच्यात चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी दलित प्रेरणा स्थळावर आंदोलन करण्याचे मान्य केले. याआधी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने मोर्चा वळवला होता.संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी नोएडा येथून संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.
प्रशासनाशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बीकेयूचे नेते चौधरी बीसी प्रधान यांनी सांगितले. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकरी दलित प्रेरणा स्थळावर आंदोलन करत राहणार आहेत. शेतकऱ्यांनी प्रशासनाला 7 दिवसांची मुदत दिली आहे, जर 7 दिवसांनी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढणार आहे, असं ते म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड लावले होते. दलित प्रेरणा स्थळावर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवले. यादरम्यान शेतकऱ्यांची पोलिसांशी चर्चा झाली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्ली- उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या चिल्ला सीमेवर बॅरिकेड लावले होते. यावेळी आरएएफचे जवान तैनात करण्यात आले होते. ड्रोनच्या माध्यमातूनही पाळत ठेवली जात होती.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
शेतकऱ्यांना 64 टक्के दराने नुकसान भरपाई मिळावी. भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाराचा लाभ द्यावा. नवीन भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या 4 पट भरपाई द्यावी. भूसंपादनाच्या बदल्यात 10 टक्के भूखंड देण्यात यावा, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.