
थकीत पीक विमाच्या रकमेसह विविध मागण्यांसाठी 11 जुलैपासून चक्रीय आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन राऊत यांनी शेतकऱ्यांना दिले.
थकीत पीक रक्कम, दुष्काळ निधीचे वाटप, प्रलंबित देवा कालव्याला 400 कोटींचा निधी द्यावा त्याचबरोबर अक्कलकोट शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा, अक्कलकोट तीर्थक्षेत्राचे 368 कोटी तातडीने द्या, शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज द्या, डीपीडीसी योजनेचे डेपो तातडीने द्या, शेतकऱ्यांना वकसंग टोलनाका टोलमुक्त करा यासह अनेक मागण्यांसाठी सोलापूरच्या अक्कलकोटमधील शेतकरी 11 जुलैपासून चक्रीउपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केल्या. शेतकऱ्याच्या मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन राऊत यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख अमर पाटील, तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे तसेच अक्कलकोट तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.