कल्याण-मुरबाड रेल्वेची मोजणी मानिवलीतील शेतकऱ्यांनी बंद पाडली, आमच्या जिवावर उठलेला प्रकल्प नको

कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली जागेची मोजणी मानिवली येथील शेतकऱ्यांनी बंद पाडली आहे. हा प्रकल्प आमच्या जिवावर उठलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. भूसंपादन होणाऱ्या जागेचा किती मोबदला मिळणार, याचे कोणतेही स्पष्टीकरण न देता प्रशासनाने मोजणी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे विभागाकडून जमीन मोजणीचे काम सुरू आहे. मुरबाड रेल्वेसाठी आता नव्याने सव्र्व्हे करण्यात आला आहे. ही रेल्वे आंबिवली, मोहिली मार्गे मानिवली येथून जाणार आहे. या बदलाचा मोठा फटका मानिवली येथील शेतकऱ्यांना बसणार आहे. रेल्वेचे पथक जमीन मोजणीसाठी मानिवली येथे आले असता शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आणि मोजणीचे काम बंद पाडले. या वेळी सुनील गायकर, चंद्रकांत गायकर, संतोष वारघडे, रुपेश गायकर, नवनाथ गायकर, सुनील दगडू गायकर, बाळाराम जाधव, अमोल माळी, रामलाल सहाणी, विजय माळी, जयवंती गायकर, उद्देश माळी या शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शन केली.

प्रकल्पाला विरोध नाही

रेल्वे प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र या प्रकल्पामुळे मानिवलीतील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. 23 शेतकऱ्यांची सुमारे दोन हजार गुंठे जमीन या प्रकल्पात जात आहे. या जागेत आंबा, पेरू, चिकू, नारळ आदी हजारो झाडे आहेत. भूसंपादीत होणाऱ्या या जागेचा शासन काय मोबदला देणार हे सांगितले जात नाही. तसेच जागेचा भाव निश्चित केला जात नाही. शेतकरी व संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन आमच्या आडचणी सोडविल्या पाहिजेत. मात्र तसे न करता डायरेक्ट नोटीस देऊन जमीन मोजणीस सुरुवात करण्यात येत आहे, अशी खंत अॅड. सुनील गायकर यांनी या वेळी व्यक्त केली.

…तर आत्मदहन करू

रेल्वे प्रशासनाने केलेला जुना सर्व्हे बरोबर होता. त्या सव्र्व्हेमध्ये जास्त जागा सरकारची जात होती आणि शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होत होते. परंतु नव्या सव्र्व्हेमुळे जास्त नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे. हा सर्व खटाटोप अधिकाऱ्यांना हाताशी धरून केला जात आहे. प्रशासनाने जर हा प्रकल्प जबरदस्तीने आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्मदहन करू, असा इशाराही येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.