कांदा व दूध दरावरून शेतकरी संतप्त, सुजय विखेंना विचारला जाब

पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणूकीनंतर थेट दुसऱ्या निवडणुकीसाठी मत मागण्यासाठी कर्जत तालुक्यातील निमगांव गांगर्डा येथे खा. डॉ. सुजय विखे हे बुधवारी सकाळी पोहचले होते. त्यांना संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून विखे यांच्यावर तिथून काढता पाय घेण्याची नामुष्की ओढवली.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुजय विखे यांचा बुधवारी कर्जत तालुका दौरा होता. डॉ. विखे यांच्या दौऱ्यामध्ये निमगांव गांगर्डाचा समावेश नव्हता, मात्र बुधवारी निमगांव गांगर्डा येथील ग्रामदैवत कालभैरवनाथांचा यात्रोत्सव होता. यात्रोत्सवानिमित्त हजारो भाविकांची गर्दी होणार असल्याने तिच संधी साधून डॉ. विखे हे त्यांचा ताफा घेउन निमगांव गांगर्डा येथे पोहचले. मंदीरात जात दर्शन घेउन परतत असताना ताफ्यातील वाहनामध्ये सुजयपर्व हे गाणे लावण्यात आले. तिथूनच शेतकऱ्यांच्या रोषाला सुरूवात झाली.

विखे यांनी पाच वर्षात गावाकडे लक्ष दिले नाही. एकही विकास काम केले नाही. दुध, कांद्याचे दर कोसळलेले असताना त्याविरोधात संसदेत आवाज उठविला नाही. त्यामुळे निवडणूक सुरू झाल्यावर मते मागण्यासाठी त्यांनी गावात येण्याचे कारणच काय असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येत होता. दरम्यान, गाभाऱ्यातून दर्शन घेउन बाहेर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमावामध्ये डॉ. विखे आले. मोठा आरडा ओरडा सुरू झाल्यानंतर डॉ. विखे यांच्या अंगरक्षकाने विखे यांच्या भोवती जमलेल्या तरूणांना दूर केले. त्यानंतर डॉ. विखे हे तिथून निघून गेले.