शेतकऱ्यांचा ‘दिल्ली मार्च’ रोखला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या; रासायनिक पाण्याचे फवारेही मारले

हरयाणा-पंजाबच्या शंभू सीमेवरून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करत असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांवर आज पोलिसांनी पुन्हा जुलमाचा वरवंटा फिरवला. पोलिसांनी आंदोलकांना घग्गर नदीच्या पुलावरील बॅरिकेड्सवर रोखले. यावेळी तब्बल 40 मिनिटे आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रासायनिक पाण्याचे फवारेही मारले. यात 10 शेतकरी जखमी झाले.

जुलमी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी 26 नोव्हेंबरपासून केंद्रातील भाजप सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारने अंबाला जिह्यातील 12 गावांमधील इंटरनेट बंदी 17 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. दुसरीकडे, खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

16 डिसेंबरला ‘ट्रक्टर मार्च’

आज शंभू सीमेवरून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेकडो शेतकर्यांवर केंद्रातील भाजप सरकारने बळाचा वापर केला. आम्हाला रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, आमच्यावर रासायनिक पाण्याचे फवारे मारले. यात 17 शेतकरी जखमी झाले असून, अनेकांची प्रकृती गंभीर आहे. इस्पितळात योग्य उपचार केले जात नाहीत असा आरोप शेतकरी नेते सरवण सिंग पंधेर यांनी केला. 16 डिसेंबर रोजी पंजाब वगळता इतर भागात शेतकऱ्यांनी ट्रक्टर मार्च, तर 18 डिसेंबर रोजी पंजाबमध्ये ‘रेल रोको’ पुकारला आहे. यामध्ये पंजाबी बांधवांनी सहभागी व्हावे. विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही संसदेत आवाज उठवायला हवा’, अशी मागणीही सरवण सिंग पंधेर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

शेतकऱ्यांचे बरेवाईट झाले तर मोदी सरकार जबाबदार

या आंदोलनात कोणत्याही शेतकऱ्याचे बरेवाईट झाले तर त्याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार असेल असा इशारा उपोषणकर्ते शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी दिला आहे. या आंदोलनाचे पडसाद लोकसभेतही उमटले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानी-अंबानींचा फायदा करून देता, मग शेतकऱ्यांवर अत्याचार का करता, असा सवाल केंद्रातील भाजप सरकारला केला.