शेतमालास किमान हमीभाव (एमएसपी) देण्यात यावा, नवीन कृषी कायद्यांतर्गत भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील हजारो शेतकऱयांनी राजधानी दिल्लीकडे कूच केली आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या बळीराजाचा मोर्चा दिल्लीच्या सीमेवर अडविण्यात आला असून, मोठे बॅरिकेट्स लावून प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नोएडातील एक्प्रेस-वे बंद झाल्याने प्रचंड वाहतूककाsंडी झाली.
संयुक्त किसान मोर्चा, भारतीय किसान परिषद, किसान मजदूर संघासह विविध शेतकरी संघटनांनी एकत्रितपणे पंधरा दिवसांपूर्वी संसद परिसराकडे हल्लाबोल मोर्चा नेणार, असा इशारा दिला होता. 27 नोव्हेंबरला ग्रेटर नोएडा प्राधिकरणात आंदोलन केले होते. 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या काळात यमुना प्राधिकरण येथे निदर्शने केली. मात्र, शेतकऱयांच्या मागण्यांकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आणि उत्तर प्रदेशातील 20जिह्यांतील हजारो शेतकऱयांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली.
मोदी सिनेमा पाहण्यात दंग
हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ सिनेमा पाहण्यात गुंग होते. संसदेतील बालयोगी सभागृहात ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमाचा विशेष शो आयोजित केला होता. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्री आणि सत्ताधारी खासदार चित्रपट पाहण्यात दंग होते.
दिल्लीत जाण्यावर शेतकरी ठाम
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱयांनी हल्लाबोल मोर्चा काढला आहे. 6 डिसेंबर रोजी संसदेवर मोर्चा नेण्यावर शेतकरी ठाम आहेत. आज काही ठिकाणी शेतकऱयांनी बॅरिकेट्स तोडले. पोलिसांबरोबर झटापट झाली.
या आहेत मागण्या
- शेतमालास किमान हमी भावानुसार (एमएसपी) दर मिळावा.
- जुन्या भूसंपादन कायद्यानुसार सरकारने अधिग्रहित केलेल्या जमिनीचा 64.7 टक्के वाढीव मोबदला आणि 10 टक्के भूखंड प्रभावित शेतकऱयांना मिळावा.
- 1 जानेवारी 2024 नंतर सरकारने संपादित केलेल्या जमिनीवर नवीन कृषी कायद्यांतर्गत बाजारभावाच्या चौपट मोबदला आणि 20 टक्के भूखंड देण्यात यावा.
- भूमिहीन शेतकऱयांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्वसनाचा लाभ द्यावा.
शंभू सीमेवर 13 फेब्रुवारीपासून आंदोलन
पंजाब-हरयाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर 13 फेब्रुवारीपासून शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. 10 महिन्यांपासून येथे शेतकरी तळ ठोकून आहेत. 6 डिसेंबरला दिल्लीत होणाऱया मोर्चात हेही शेतकरी सहभागी होतील. आज दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी रोखले, अशी माहिती किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वनसिंह पंढेर यांनी सांगितले.