वाढीव रोजंदारी देऊनही कापूस वेचणीला मजूर मिळेना; शेतकऱ्यांनी चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत लावले कामाला

मजुरांची टंचाई आणि ढगाळ वातावरण आणि पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी मजुराला हवा तो दर देऊन कापूस वेचणीस सुरुवात केली. कापूस वेचायला तब्बल 10 ते 12 रुपये प्रति किलो भाव देऊनही मजूर मिळत नाही. त्यामुळे घरातील पुरुष मंडळींसह, लहानसहान मुलाबाळांसह, सर्व कुटुंब कापूस वेचणीला लावले आहे. मजुरांना सुगीचे दिवस असले तरी शेतकऱ्यांचे दिवाळे निघत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस तसेच सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सोयाबीन सोंगणी तसेच कापूस वेचण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांची जुळवाजुळव करीत आहे. या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतात वापसा नसताना चिखलात जेमतेम आलेले कपाशीचे व सोयाबीनचे पीक घरी आणण्यासाठी लगबग सुरू होती. कपाशी वेचायला मजूर मिळेना, पावसाने उघडीप दिल्याने कपाशीचे शेतशिवार कापूस फुटल्याने पांढरे झाले आहे.

सोयाबीनच्या पिकांची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ढिगारे घालून ठेवले आहे. खळे करून घरात माल आणण्याची वेळ आली आणि परतीच्या पावसाने पिकाची वाट लावत असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या घरातील फक्त सध्या आठवणी ठरणार आहेत. गेल्यावर्षी कापूस वेचणीसाठी एका किलोला 7 ते 8 रुपये दर दिला जात होता. मात्र, पावसामुळे यामध्ये वाढ झाली असून, आता शेतकऱ्यांना काही ठिकाणी 10 ते 12 रुपये दर द्यावा लागत आहे. कापसाला भाव कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था यावर्षीही कायम आहे. मागीलवर्षी कापूस वेचणीसाठी 8 रुपये किलोप्रमाणे दर द्यावा लागत होता. यावर्षी मात्र सोयाबीन काढणी, कापूस वेचणी ही सर्व कामे एकत्रच आल्याने त्यातच परतीच्या पावसामुळे मालाची दाणादाण होत असल्याने हाती आलेला कापूस गमाविण्याच्या मनःस्थितीत शेतकरी नाही. त्यामुळे अतिरिक्त पैसे मोजून शेतकरी कापूस वेचणी करीत आहे. वेचणी करून घरात आणेपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसा ओतावा लागतो. मात्र, बाजारात वेभाव विक्री करावी लागत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत असून, शेतकऱ्यांचे दिवाळीत दिवाळं निघाले आहे. यावर्षी सतत पावसाने हजेरी लावली तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने कपाशीच्या पिकाचे उत्पादन घटले आहे.

कापूस कसा वेचावा
वडीगोद्री परिसरातील बागायती शेती करणारे शेतकरी मागील काही वर्षांपासून बाहेरील मजूर मजुरीसाठी आणत होते. मात्र, यावर्षी सगळीकडे समाधानकारक पाऊस असल्याने बाहेरील मजूर येण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत शेतातील कापूस कसा वेचावा, हा प्रश्न सध्या सतावत आहे. त्यामुळेच अतिरिक्त मजुरी देऊन कापूस वेचणी करावी लागत आहे, असे शेतकरी अंकुश तारख यांनी सांगितले. तर महाकाळा येथील शेतकरी रामेश्वर लहाने म्हणाले की, यंदा अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात कापसासारखे नगदी पीक हातून गेले आहे. सध्या कापूस वेचणी सुरू असून, वेचणीसाठी मजुरांना 10 ते 12 रुपये किलोप्रमाणे दर द्यावा लागत आहे. ते देऊनही मजूर मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.