
बटाटा पिकाचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या सातगाव पठार भागातील शेतकर्यांनी रब्बी हंगामातील बटाटे काढणीस सुरुवात केली आहे. मात्र मजूर तुडवडा जाणवत असल्याने घरातील व भावकीच्या मदतीने बटाटा काढणीत शेतकरी व्यस्त आहे. चांगला पाऊस सुरुवातीस झाल्याने अनेक शेतकर्यांनी बटाटा पीक घेतले आहे. कारेगाव, भावडी, थुगाव, पेठ, पारगाव, कुरवंडी, भागात मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनी पुखराज, 1533, ज्योती अशी विविध जातीचे बियाणे लागवड केली आहे. सध्या काढणीला आलेला बटाटा चांगला फुगला आहे. चांगले उत्पादन निघत असल्याने शेतकरी आनंदित आहे. सध्या नवीन बटाट्याला 17 ते 18 रुपये प्रतिकिलोस बाजारभाव मिळत आहे.
सध्या पाऊस थांबल्याने बाजारभाव वाढला तर शेतक-याला चांगले उत्पन्न मिळते. खर्चही त्या तुलनेत जास्त येत आहे. बियाणे खरेदी, खते, औषधे, फवारणी, मजुरी यात जास्त खर्च होत आहे. त्यामुळे एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च येत असल्याने बाजार भाव वाढणे गरजेचे आहे, असे शेतकरी सांगतात. मजूर तुटवडा व उपलब्ध मजूर मुद्दाम वाढवून मजुरी घेत असल्याने शेतकरी मजुरी जास्त देऊन बटाटे शेतातून काढून घेत असल्याचे कारेगाव येथील शेतकरी विशाल कराळे यांनी सांगितले. काढलेले बटाटे मुंबई किंवा पुणे मार्केटमध्ये नेऊन विकण्यासाठी शेतकरी तयारीत आहे. मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात आदिवासी भागात असलेले मजूर या परिसरात दाखल झाले आहेत. मात्र मजुरीचे दर पुरुषाला चारशे तर महिलेला तीनशे रुपये द्यावे लागत आहेत. त्यांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा, राहण्याची सोय करूनही मजूर तुटवडा भासत आहे. एका एकरात पंधरा मजूर दोन दिवस काम करतात. एक क्विंटल बटाटे बियाणे पोत्याला साधारण13 ते 15 कट्टे बटाटे निघत आहेत. मागील तीन-चार वर्षांपासून बैलांपासून शेती करणे व लागवड करणे बंद झाले आहे. सर्रास लहान-मोठे शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्यानेच लागवड व बटाटा काढणी करत आहे. पूर्वी बटाटा लागवड म्हटले की, 15 ते 20 मजूर, बैल, औतासह शेतकरी कुटुंब असा शेतात गर्दीचा माहोल दिसत होता. परंतु पारंपरिक पद्धतीने बटाटा लागवड आता कालबाह्य झाल्याने प्रत्यक्ष शेतात बटाटा लागवड मशीनद्वारे व दोन व्यक्ती करतानाचे चित्र शेतात दिसत आहे.
सध्या बटाटा पीक परिपक्व अवस्थेत असून परतीचा पाऊस अधिक पडल्यास बटाटा शेतात सडण्यापेक्षा पावसाने उघडीप दिल्याने तत्काळ काढणीवर शेतकर्यांनी भर दिला आहे. ज्या शेतकर्यांनी लवकर बटाटा लागवड केली आहे त्यांनी काढणी सुरू केली आहे. परिणामी शेते मजुरांनी गजबजू लागली आहे.
राजाराम पवळे