
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचे विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. आता एकनाथ शिंदे 5 एप्रिलला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांना अडवण्याचा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आज दिला आहे.
कोल्हापूरमध्ये सर्किट हाऊसवर संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कोल्हापूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक आल्यावर कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी ते पाळले नाही, म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे.
इंडिया आघाडीचा संघर्ष समितीला पाठिंबा
एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारशी गद्दारी केली तेव्हा जनतेने त्यांना हलक्यात घेतले. पण शेतकऱ्यांशी गद्दारी करत असतील तर कोल्हापुरातील शेतकरी व सामान्य जनता सहन करणार नाही. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2 हजार 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण तरीही विजयी मेळावा घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. 12 मार्च रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हाही एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही. स्टार्ट अप कॉमेडियन कुणाल कामराचे गाणे वाजवून एकनाथ शिंदे यांचा विरोध करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली. सरकारच्या दडपशाहीला कोल्हापुरातील जनता भीक घालणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे.
आंदोलनाची व्यापकता वाढणार
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीने शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून संघर्ष समितीला पाठिंबा दिला आहे. यानिमित्त उद्या (शुक्रवारी)कोल्हापूरच्या सर्किट हाऊसवर दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहे.