महावितरणकडे पैसे भरूनही सोलार मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मागेल त्याला सोलार या योजनेसाठी महावितरणकडे पैसे भरूनही सोलार मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाकडून शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठ्यासाठी मागेल त्याला सोलार पंप योजना सुरू करण्यात आली आहे. योजना चांगली आहे, मात्र, अंमलबजावणीमध्ये गोंधळ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांनी नवीन विहिरी, कूपनलिका खोदल्या आहेत. यासाठी मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत अनेकांनी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सोलार पंपासाठी अर्ज भरले होते. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस या योजनेची साइट बंद झाली होती. मागेल त्याला सोलर या महावितरण पोर्टलची साईट आता ओपन झाली आहे. त्यात सोलर पंपासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याचा पर्याय आहे. मात्र, पुरवठादार निवडण्याचा कोणताही पर्याय येत नसल्याने शेतकरी मात्र संभ्रमात आहेत. सोलरसाठी पैसे भरावेत की नाही, या द्विधा मनःस्थितीत अनेक शेतकरी आहेत. तर ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना दोन महिन्यांपासून पुरवठादार निवडण्याचा पर्याय येत नसल्याने ते शेतकरी इकडे आड अन् तिकडे विहीर अशा अडचणीत सापडले आहेत.

पैसे भरल्यानंतर सोलारची कंपनी निवडता येत नाही, तसा पर्यायही नाही, तर दुसरीकडे नव्या शासनाचा कंपनीशी करारही झालेला नाही. यामुळे पैसे भरूनही शेतकऱ्यांना सोलार मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पैसे भरल्यानंतर सोलार पंप कधी मिळेल, याबाबत कुठलीही माहिती दिली जात नाही. महावितरणचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

महावितरणकडे भरलेले पैसे पडून

मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी माझी दोन महिन्यांपूर्वी निवड झाली होती. मी तत्काळ पैसे भरले. आता दोन महिने झाले तरीही कंपनी निवडण्याचा पर्याय येत नसल्याने महावितरणकडे पैसे भरूनही सोलर पंप कधी येईल, याची वाट पहावी लागत आहे, असे वडीगोद्री येथील शेतकरी अभिजित काळे यांनी सांगितले. दरम्यान, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पाणी असूनही सौरपंप नसल्यामुळे अडचण येत आहे. तर याबाबत महावितरण विभागाचा कुठलाही अधिकारी माहिती देण्यास तयार नाही. महावितरणने तत्काळ सोलार योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.