मुरबाडमधील शेतकऱ्यांची खाती परस्पर गोठवली, ठाणे जिल्हा बँकेचा अजब कारभार

शेतकऱ्यांच्या जीवावर ठाणे जिल्हा सहकारी बँक चालते. ॐ मात्र बँकेतील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना तुच्छ वागणूक देत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीक कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांची खाती गोठवण्याचे बेकायदा काम जिल्हा बँकेत सुरू आहे. सरळगाव शाखेत अनेक शेतकऱ्यांची खाती गोठवल्याने शेतकऱ्यांना कर्ज, अनुदान या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

साखरे सेवा संस्थेचे खातेदार राजेश पवार यांचे पीक कर्ज थकीत असल्याने सेवा सहकारी सोसायटी आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक सरळगाव शाखा प्रबंधक यांनी त्यांचे बचत खाते गोठवले आहे. शेतकऱ्यांची बचत खाती कायद्याने बंद करता येत नाहीत. तरीही सेवा संस्थेचे सेक्रेटरी आणि बँक अधिकारी, कर्मचारी मनमानी करून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. शेतकऱ्यांची खाती परस्पर गोठवल्याने त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये मिळणे बंद झाले आहे.

अधिकाऱ्यांची मनमानी

मुळात पीक कर्ज आणि बचत खाते याचा काहीही संबंध नाही. पीक कर्ज जरी थकीत असले तरी शासन ते माफ करण्याबाबत अथवा कर्ज नूतनीकरणाबाबत निर्णय घेऊ शकते. असे असतानाही बँकेने मनमानी करत परस्पर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा उद्योग सुरू केल्याने संताप व्यक्त होत आहे.