शेतकऱ्याला मारहाण करून कांद्याच्या पट्टीचे पैसे लुटले, जामखेडमधील घटनेने खळबळ

जामखेड येथे कांदा विकून मिळालेले पट्टीचे पैसे घेऊन परत गावी जात असताना जामखेड-करमाळा रोडवरील चुंबळी फाटय़ाजवळ पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी शेतकऱयाची दुचाकी रोखून त्यांना बेदम मारहाण करत मोबाईलसह त्यांच्या जवळील 1 लाख 64 हजार रुपये लुटले. ही घटना सोमवारी (दि. 15) सायंकाळी घडली.

याप्रकरणी शेतकरी विकास दत्तू मलंगणेर (वय 45, रा. नान्नज) यांनी फिर्याद दिली असून, जामखेड पोलिसांनी चार अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेतकरी विकास मलंगणेर यांनी पंधरा दिवसांपूर्वी शेतातील काढलेला कांदा जामखेड येथील एका ट्रेडर्सच्या दुकानात विकला होता. यानंतर शेतकरी विकास मलंगणेर हे काल सोमवार (दि. 15) कांद्याचे पैसे आणण्यासाठी जामखेडला आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे जोडीदार अशोक महादेव मोहळकर होते. मलंगणेर यांनी कांद्याच्या पट्टीचे 1 लाख 60 हजार रुपये घेऊन ते जोडीदारासोबत दुचाकीवरून नान्नज गावी चालले होते.

यावेळी पाळत ठेवून असलेल्या चौघा अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या दोन दुचाकींवरून या शेतकऱयांचा पाठलाग केला. यावेळी चोरटय़ांनी मलंगेकर यांची दुचाकी चुंबळी फाटय़ावर रोखली. यावेळी मलंगेकर आणि मोहोळकर यांना बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील 1 लाख 60 हजार रुपये आणि मोबाईल पळवून नेला. या घटनेत मलंगेकर आणि मोहळकर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शेतकरी विकास मलंगेकर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे करत आहेत.

भररस्त्यात सायंकाळी शेतकऱयाला मारहाण करून लुटण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यापूर्वीदेखील भरदिवसा जामखेड-कुसडगाव रोडवरील काजेवाडी तलावाजवळ एका सोन्याच्या व्यापाऱयास लुटण्यात आले होते. जामखेड तालुक्यात भरदिवसा चोरी व लुटमारीच्या घटना वारंवार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या चोरटय़ांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.