जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, जिल्ह्यात दहा महिन्यांत 137 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली

केळी व कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढल्या असून चिंताजनक आकडेवारी समोर आल्याने शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणामुळे मृत्यू ‘लाडका’ झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या दहा महिन्यांत नैराश्यातून तब्बल 137 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. शासकीय आकडेवारीतून हे विदारक वास्तव समोर आले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार येणारी नापिकी व पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेतून यातील बहुतांश शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांकडून वेळोवेळी सादर झालेल्या मदत प्रस्तावांवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दरमहा दोन ते तीन वेळा जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत चर्चा होते. त्यानुसार पात्र मदत प्रस्तावना शासन निकषानुसार प्रत्येकी एक लाख रुपये मदत अनुदान देण्यात येते. या प्रस्तावांनुसारच जिल्ह्यात जानेवारी 2024 ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत 137 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्र आहे. त्यात कपाशी, ज्वारी, बाजरी या जिरायती वाणांसह केळी आणि थोडय़ा फार प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र आहे. रब्बी हंगामात हरबरा, गहू, ज्वारीसह सूर्यफूलाचीही लागवड केली जाते. मागील काही काळापासून दुष्काळ, अककाळी पाऊस, तर अनेकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागतो. यासह तीन वर्षांपासून कापूस व सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. यामुळेच कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेतून बहुतांश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत.

धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच गुरुवार दि. 28 रोजी सायंकाळी समोर आली. दीपक शिकाजी चौधरी (42) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नापिकी आणि कर्जामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेकाईकांनी दिली. दीपक चौधरी यांनी खासगी व सोसायटीकडून 5 लाखांचे कर्ज घेतले होते. धरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत शेतकऱ्यांची आकडेवारी

जानेवारी – शेतकरी 12
फेब्रुवारी – शेतकरी 18
मार्च – शेतकरी 14
एप्रिल – शेतकरी 18
मे – शेतकरी 14
जून – शेतकरी 12
जुलै – शेतकरी 14
ऑगस्ट – शेतकरी 10
सप्टेंबर – शेतकरी 12
ऑक्टोबर – शेतकरी 13
असे मयत शेतकरी आहेत.