शेतीच्या वादातून तसेच खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथील हौशिराम राधू लाटे (64) या शेतकऱ्याने राहत्या घराच्या जवळच पहाटे साडेपाचच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत बेल वंडी पोलीस ठाण्यात मनोहर हौशिराम लाटे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आत्महत्या करण्यापूर्वी हौशिराम यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बाबासाहेब सदाशिव लाटे, यमुना बाबासाहेब लाटे, कुंडलिक बाबासाहेब लाटे, राजेंद्र बाबासाहेब लाटे हे भावकी मधील चार शेतकरी बांधावरून त्रास देत होते तर शिवाजी रघुनाथ भोसले हा खाजगी सावकार देखील त्रास देत होता असा आरोप केला आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी त्या सर्वांना अटक केली आहे.
या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांचे वडील हौशिराम राधू लाटे यांनी31 जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घराशेजारील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी फिर्यादी यांच्या वडिलांनी शेवरीच्या झाडाला सहा ते सात पाणी चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. या मध्ये त्यांनी भावकी मधील चार जण तसेच खाजगी सावकाराकडून 1997 साली 10 हजार रुपये व्याजाने घेतले असल्याची माहिती लिहून ठेवत खाजगी सावकार दहा हजार रुपयांचे पाच लाख रुपये मागत असल्याचे लिहून ठेवले होते. या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले.
मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. बेलवंडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाचही आरोपींना ताब्यात घेतले. या बाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.