शंभू सीमेवर आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या, शेतकरी नेत्यांचा आक्रोश

मागील मोठय़ा कालावधीपासून शंभू सीमेवर शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. सरकारच्या वृत्तीला पंटाळून आज आणखी एका शेतकऱयाने आत्महत्या केली. रेशम सिंग (55) असे मृत शेतकऱयाचे नाव आहे. आंदोलनादरम्यान सल्फास प्राशन करत शेतकऱयाने मृत्यूला कवटाळले.रेशम सिंग हे पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील पाहुविंदचे रहिवासी होते.

संबंधित शेतकऱयावर तातडीने घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पटियाला येथील राजिंद्र इस्पितळात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तब्बल 11 महिने आंदोलन करूनही तोडगा न निघाल्यामुळे रेशम सिंग हे पेंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराज होते, असे शेतकरी नेते तेजबीर सिंग यांनी सांगितले.

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली 13 फेब्रुवारी 2023 पासून पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत. शेतकऱयांनी अनेकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकारने बळीराजाच्या जखमेवर केवळ मीठ चोळण्याचे काम केले.

डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक

संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या आमरण उपोषणाचा आज 45 वा दिवस आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून रक्तदाब सातत्याने घसरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना कोणीही न भेटण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ‘कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान दिल्लीतील शेतकऱयांची बैठक घेतात, पण आमरण उपोषण करत असलेल्या डल्लेवाल यांची ते भेट घेत नाहीत. 2016 च्या कृषी जनगणनेनुसार दिल्लीतील शेतकऱयांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. डल्लेवाल यांची ढासळलेली प्रकृती पाहता पेंद्र सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा,’ असे शेतकरी नेते अभिमन्यू कोहर म्हणाले.