डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक; बोलणेही बंद, जिवाचे बरेवाईट झाल्यास परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर

शेतमालाला किमान हमीभाव मिळण्यासह विविध मागण्यांसाठी हरयाणा आणि पंजाबच्या खनौरी सीमेवर आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना बोलण्यातही अडचणी जाणवत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा 44 वा दिवस असून त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास परिस्थिती केंद्र सरकारच्या हाताबाहेर जाईल असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

येत्या 26 जानेवारीला देशभरात ट्रक्टर मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱयांनी केला आहे. याबाबतचा आराखडा येत्या काही दिवसांत जारी करण्यात येणार असून केंद्र सरकारने गांभीर्याने शेतकऱयांचे प्रश्न सोडवावेत. डल्लेवाल यांची प्रकृती आता सरकारच्याच हातात आहे असे शेतकरी नेत्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, डल्लेवाल यांनी कुठल्याही प्रकारचे उपचार घेण्यास नकार दिल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. 5 रिव्हर्स हार्ट असोसिशन या स्वयंसेवी संस्थेच्या पथकातील डॉक्टर अवतार सिंग यांनी डल्लेवाल यांची प्रकृती सोमवारी सायंकाळपासूनच चिंताजनक बनल्याचे सांगितले.

…तर मोदी सरकारच्या कारकिर्दीवर डाग

डल्लेवाल यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून जर त्यांना काही झाले तर मोदी सरकारला अत्यंत जड जाईल. मोदी सरकारच्या कारकिर्दीवरचा हा कधीही न पुसणारा डाग असेल असा इशारा शेतकरी नेते कोहर यांनी दिला. तसेच त्यानंतर परिस्थिती केंद्र सरकारच्या नियंत्रणात नसेल असेही त्यांनी म्हटले आहे. जर आंदोलन चिघळू नये असे सरकारला वाटत असेल तर सरकारने शेतकऱयांच्या मागण्या मान्य कराव्या. आमचे ऐकून घ्यावेत असेही ते म्हणाले.

रक्तदाब कमी झाला, उलटय़ांचा त्रास सुरू

डल्लेवाल यांचा रक्तदाब अत्यंत कमी झाला असून त्यांना बेडवरच उलटय़ांचा त्रास सुरू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून त्यांच्या जिवाचे बरेवाईट होऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सरकारच्या वतीनेही डॉक्टरांच्या पथकाने त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांना मंगळवारपासून बोलताही येत नसल्याचे डॉक्टर म्हणाले.

10 जानेवारीला भाजपा सरकारच्या पुतळ्याचे दहन

उद्या 10 जानेवारी रोजी शेतकऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱया भाजपाप्रणीत सरकारच्या पुतळ्याचे देशभरात विविध ठिकाणी दहन करून आंदोलन करण्यात येईल असे शेतकरी नेते कोहर यांनी सांगितले. तसेच 13 जानेवारीला कृषी व्यापार आराखडय़ाच्या राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्याच्या प्रतींचे दहन करण्यात येईल आणि 26 जानेवारी रोजी ट्रक्टर मोर्चा काढण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.