शेतकरी नेते डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक, अवयव निकामी होण्याची डॉक्टरांची भीती

शेतमालाला किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी खनौरी बॉर्डवर तब्बल 27 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. डॉक्टरांनी आज त्यांची शारीरिक तपासणी केल्यानंतर डल्लेवाल यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली. त्यांना कार्डियाक अरेस्ट आणि अनेक अवयव निकामी होण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे.

70 वर्षीय डल्लेवाल 26 नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. डल्लेवाल यांच्या प्रकृतीची डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घेतली जात आहे, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या संयुक्त निवेदनात देण्यात आली आहे. डल्लेवाल यांची हालचाल प्रचंड मंदावली असून त्यांच्या रक्तदाबात सातत्याने चढउतार होत आहेत. काही वेळा तर त्यांचा रक्तदाब अत्यंत कमी होत आहे, त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज असल्याचे 5 रिव्हर्स हार्ट असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेच्या डॉक्टरांनी सांगितले.

शरीरात संसर्ग वाढण्याची भीती

गेल्या 27 दिवसांपासून डल्लेवाल आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमजोर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात आणखी संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांचे हात आणि पाय थंड पडले आहेत. उपोषणामुळे त्यांच्या शरीरातील विविध क्रियांना फटका बसला आहे. यकृत आणि किडनीसारखे महत्त्वाचे अयवय निकामी होण्याची भीती निर्माण झाल्याचे डल्लेवाल यांची शारीरिक तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी खनौरी बॉर्डरवर पत्रकारांना सांगितले.