शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही देश कृषिप्रधान म्हणता, लाज वाटली पाहिजे! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना सुनावले

तुम्हाला शेतकऱ्यांना मारण्यासाठी निवडून दिले का? शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा आमदार-खासदार-मंत्री कुठे असतात, असा सवाल करतानाच शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही आपला देश कृषिप्रधान असल्याचे सांगत का मिरवता, असा संताप आत्महत्या केलेले राज्य पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांच्या भगिनी सत्यभामा नागरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासमोर व्यक्त केला.

बुलढाणा जिह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली. कैलास नांगरे यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज त्यांच्या मूळ गावी शिवनी आरमाळ येथे संपन्न झाला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिक आमदार सुनील कायंदे यांच्यासह वेगवेगळ्या जिह्यांतील शेकडो शेतकरी, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी कैलास नागरे यांच्या भगिनी सत्यभामा नागरे यांनी मनातील संताप व्यक्त करून आमदार, खासदार आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची अक्षरशः लाज काढली. पालकत्व येत नसेल तर पालकत्व का स्वीकारता? देशाला कृषिप्रधान म्हणता? मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर आमचा कृषिप्रधान देश काय कामाचा? याची लाज वाटली पाहिजे असे म्हणत, माझ्या भावाच्या नावासमोर आत्महत्या नाही तर बलिदान हा शब्द लावण्यात यावा, असे त्यांनी सुनावले.

त्या म्हणाल्या की, माझ्या भावाला हे माहीत होते की, या देशात बलिदान दिल्याशिवाय काहीही होत नाही आणि म्हणून त्याने शेतकऱ्यांसाठी बलिदान दिले आहे. देशाला राजकारणी हे कृषिप्रधान म्हणतात, यांना लाज वाटायला पाहिजे की, कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतो आणि तेही पाण्यासाठी. माझ्या भावाने पालकमंत्र्यांना वारंवार विनंती केली. मात्र, अशा पालकमंत्र्यांना पालकत्व स्वीकारता येत नसेल तर कशाला पालकत्व स्वीकारतात? त्यांनाही लाज वाटली पाहिजे, असे खडे बोलही सत्यभामा नागरे यांनी सुनावले.

मतदान मागताना शेतकऱ्यांच्या दाराला माती ठेवत नाहीत. आणि निवडून आल्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या आल्या की हे सर्व बेपत्ता होतात. तुम्हाला शेतकऱ्यांना मारण्यासाठी निवडून दिले का असा संताप सत्यभामा यांनी व्यक्त केला.

मंत्र्याची मान खाली

सत्यभामा नागरे या खडे बोल सुनावत होत्या तेव्हा मंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिक आमदार सुनील कायंदे हे खाली मान घालून बसले होते.