नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होकर्णा येथील शेतकर्‍याने संपवलं जीवन

होकर्णा (ता. जळकोट) येथील तरुण व अल्पभूधारक शेतकरी नागनाथ व्यंकटी बेल्लाळे (वय 35 वर्षे) यांनी कर्जबाजारीपणा व सततची नापिकी याला वैतागून वैफल्यग्रस्त होऊन 10 जानेवारी रोजी शेतातील तण नाश करण्यासाठी आणलेले विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरू होते. पण अखेर काल रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

कधी नापिकी तर कधी अतिवृष्टी यामुळे शेती साथ देत नव्हती. त्यातच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज व बचत गटाचे कर्ज डोईवर होते. ते फिटत नसल्याची चिंता व कसे जगायचे? हा सवाल नागनाथ व्यंकटी बेल्लाळे यांना सातत्याने छळत होता. त्यामुळे 10 जानेवारी रोजी त्यांनी शेताकरिता आणलेले तणनाशक विषारी औषध प्राशन केले. ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय, जळकोट येथे उपचारासाठी त्यांना दाखल केले. मात्र जास्त प्रमाणात औषध घेतल्याचे निदर्शनास आल्यावर पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. तथापि, उपचारा दरम्यान 16 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने संसार उघड्यावर आला असून, त्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने पंचनामा व योग्य ती कारवाही करून तात्काळ शासकीय आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.