
शेतावर घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत परभणीतील माळसोन्ना येथील एका 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. सचिन जाधव यांनी 13 एप्रिलला आपले आयुष्य संपवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी ज्योती हिनेही विष पिऊन मृत्यूला कवटाळले. पतीपाठोपाठ पत्नीनेही आत्महत्या केल्याने त्यांच्या दोन लहान मुली पोरक्या झाल्या आहेत. ज्योती सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.
शेतीत फारसे काही पदरात पडत नव्हते. त्यात बहिणीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज डोक्यावर असल्याने सचिन तणावाखाली होते. त्यांनी तणनाशक फवारणीचे विषारी औषध घेऊन आयुष्य संपविले. त्यांचा परभणीतील सरकारी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूची बातमी समजताच ज्योती यांनीही विष प्राशन केले. त्यांना परभणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नांदेडमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. या दांपत्यांची एक मुलगी पहिलीत शिकते तर दुसरी फक्त अडीच वर्षांची आहे.
निर्लज्ज केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध
परभणीतील सचिन आणि त्यांची सात महिन्यांची गर्भवती पत्नी ज्योत्स्ना जाधव या तरुण शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या ही शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांनी केलेली हत्या आहे. शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यातच शेतकरी कर्जमाफीचे फिरवलेले आश्वासन यामुळे कर्जबाजारी शेतकरी अधिकच निराश झाला आहे. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची केलेली ही भीषण फसवणूक आहे. ही केवळ शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या नसून शासनाने केलेले हे तिहेरी हत्याकांड आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारचा जाहीर निषेध केला आहे.