अजबच केस… सोनं-चांदी नाही तर केसांवर जडला चोराचा जीव, तब्बल 150 किलो माल लंपास

हरयाणातील फरीदाबादमध्ये चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या घरातून चक्क मौल्यवान वस्तूंऐवजी लाखो रुपये किंमतीचे केस चोरीला गेले आहेत. किमान 150 किलो वजनाचे हे केस होते. याचसोबत 2 लाख 13 हजार रुपये देखील चोरीला गेले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोरीच्या या अनोख्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रंजीत मंडल असे या पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. रंजीत मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असून ते हरयाणातील फरीदाबादमध्ये एका भाड्याच्या घरात राहतात. रंजीत महिलांचे केस गोळा करुन त्यापासून विग बनवायचे आणि ते विकायचे. केसांचे विग बनवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरानिर्वाह व्हायचा. मात्र चोरीच्या या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

मंगळवारी 14 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास रंजीतच्या घरात चोरी झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मध्यरात्री 2 च्या सुमारास चोरांनी घरात प्रवेश केला आणि खोलीचे कुलूप तोडले. यानंतर त्यांनी खोलीतून जवळपास 150 किलो केस चोरी केले. या केसाची किंमत सुमारे 7 लाख रुपये असल्याचे रंजीत यांनी पोलिसांना सांगितले. याचबरोबर घरातील 2 लाख 13 हजार रुपयांची देखील चोरी झाल्याचे रंजीतने पोसिसांना सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.