बायकोच्या आजारपणासाठी नवऱ्याने घेतली निवृत्ती, दुर्देवाने तोच दिवस तिचा अखेरचा ठरला

राजस्थानच्या कोटामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. येथे एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीच्या आजारपणासाठी निवृत्ती घेतली होती. मात्र निवृत्तीच्या कार्यक्रमाच्याच दिवशी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनचे व्यवस्थापक देवेंद्र चंदन यांच्या निरोपासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवेंद्र यांच्या निवृत्तीला आणखी तीन वर्ष शिल्लक असतानाही त्यांनी लवकर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यांची पत्नी टीना काही दिवसांपासून हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांची काळजी घेण्यासाठीच देवेंद्र यांनी निवृत्ती घेतली.

दरम्यान, देवेंद्र चंदन यांच्या निवृत्ती कार्यक्रमासाठी विशेष आयोजन केले होते. या कार्यक्रमात देवेंद्र यांच्या सहकाऱ्यांसह त्यांची पत्नीही उपस्थित होती. यावेळी देवेंद्र आणि त्यांची पत्नी टीना यांचा सत्कार करण्यात आला. या दोघांनाही हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला. यानंतर अचानक टीना यांना भोवळ आली आणि त्या जागीच कोसळल्या. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.