
प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना चेक बाऊन्स प्रकरण चांगलेच अंगलट आले असून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. राम गोपाल वर्मा यांनी शिक्षेमध्ये दिलासा मिळावा यासाठी मुंबई न्यायालयात अपील केले होते, परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
राम गोपाल वर्माच्या फर्मने ‘श्री’ नावाच्या कंपनीला चेकद्वारे 2.38 लाख रुपये दिले होते. हा चेक बाऊन्स झाला. कंपनीने महेशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत राम गोपालविरुद्ध खटला दाखल केला होता. 2022 मध्ये वर्मा यांना या प्रकरणात 5000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला. जवळपास सात वर्षांनंतर न्यायालयाने 21 जानेवारी रोजी या प्रकरणात निकाल दिला. न्यायिक दंडाधिकारी वाय. पी. पुजारी यांनी राम गोपाल वर्मा यांना दोषी ठरवताना तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा आणि 3 लाख 72 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.