क्रिकेट दौऱ्यावर कुटुंबालाही मिळणार प्राधान्य, विराटच्या नाराजीनंतर बीसीसीआयचे कौटुंबिक निर्बंध उठण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतर बीसीसीआयने क्रिकेटपटूंच्या परदेश दौऱ्यावर कुटुंबासोबत राहण्यावर निर्बंध लादले होते. मात्र या निर्बंधाबाबत विराट कोहलीने जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर बीसीसीआय आपले कौटुंबिक निर्बंध शिथिल करणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. त्यामुळे दीर्घ दौऱ्यावर असताना हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना आपल्यासोबत कुटुंबालाही ठेवायचे असेल तर परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे. याबाबत बीसीसीआय लवकरच आपला नवा नियम जाहीर करू शकते.

ऑस्ट्रेलियातील अपयश क्रिकेटप्रेमीच नव्हे तर बीसीसीआयच्याही जिव्हारी लागले होते. त्यामुळे त्यांनी परदेश दौऱ्यावर कुटुंबाला सोबत ठेवण्याच्या दिवसांवर मर्यादा आणल्या होत्या. 45 पेक्षा अधिक दिवसांचा दौरा असेल तर दोन आठवडेच कुटुंब अर्थातच पत्नी, मुले किंवा मैत्रिणीला सोबत ठेवता येईल. तसेच त्यापेक्षा कमी दिवसांचा दौरा असेल तर एक आठवड्यासाठी ही मुभा असेल, असे बीसीसीआयने सर्व क्रिकेटपटूंना निर्देश दिले होते आणि याचे चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान पालनही करण्यात आले होते.

आता बीसीसीआयची भूमिका काय…

जर परदेश दौऱ्यावर खेळाडूंना आपल्या सोबत कुटुंबाला अधिक दिवस ठेवायचे असेल तर त्यांनी परवानगीसाठी रितसर अर्ज करू शकतात अशी नवी भूमिका घेतल्याचे कळले आहे. याचाच अर्थ बीसीसीआयने आपले कौटुंबिक निर्बंध शिथिल केल्यामुळे आगामी दौऱ्यात प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या बायका-मुलांसह किंवा मैत्रिणीसह दिसू शकतो. बीसीसीआयकडून ही सवलत मिळाली तर पूर्ण संघ अर्ज करण्याची शक्यता आहे, मात्र कुटुंबाचा पूर्ण खर्च बीसीसीआय उचलणार की खेळाडूलाच करावा लागणार, याबाबतही स्पष्ट केले जाणार असल्याचे कळले आहे.

विराट काय म्हणाला होता…

आपण हॉटेलच्या रूममध्ये एकटं उदास बसण्यापेक्षा कठीण आणि तणावाच्या वेळी कुटुंब सोबत असलं की धीर मिळतो. लोकांना याचे महत्त्व कळू शकत नाही. कुटुंबासोबत जबाबदारी वाढते. आम्ही अधिक जबाबदारीने खेळतो. मैदानातले आव्हाने आणि जबाबदारी पूर्ण करून आपण जेव्हा घरी परततो तेव्हा आपल्या घरचं वातावरण अत्यंत सामान्य असतं. हेच वातावरण आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मला जेव्हा शक्य असते तेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत माझा वेळ घालवतो. ज्यांचा या मुद्द्यांशी काडीचाही संबंध नव्हता त्यांनी यात ढवळाढवळ केलीय, पण याच मुद्द्याबाबत तुम्ही खेळाडूंना विचारलात तर त्यांचे एकच म्हणणे असेल, आमचे कुटुंब आमच्यासोबत असायला हवे.

कपिल देव यांनी मांडली भूमिका

हा निर्णय योग्य की अयोग्य याची कल्पना नाही. हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हा बीसीसीआयने घेतलेला निर्णय आहे. माझ्या विचारानुसार खेळाडूंना दौऱ्यावर आपले कुटुंब गरजेचे वाटते, परंतु तुम्हाला प्रत्येक वेळी संघासोबत राहण्याचीही गरज आहे. आमच्या काळात क्रिकेटचा पहिला टप्पा खेळासाठी समर्पित असावा. दुसऱ्या टप्प्यात कुटुंबासोबत राहण्याचा आनंद घेतला जावा, असे आम्हीच ठरवायचो. हे बीसीसीआय ठरवत नव्हते. या टप्प्यांमध्ये संतुलन असायला हवे, असेही ते म्हणाले.