पोटाची खळगी भरताना आयुष्याचा झाला कोळसा, पिढीजात व्यवसायाला महागाईची झळ

लाकडापासून कोळसा तयार करण्याचा व्यवसाय काही भटक्या जमाती पिढीजातपणे करत आहेत. या व्यवसायावरच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मोठ्या कष्टाने लाकडाची भट्टी लावून, कोळसा तयार करण्यात येतो. मात्र, या कोळशाच्या विक्रीतून अतिशय तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही मुश्किल होते. आजही अनेक कुटुंबे गावागावांमध्ये फिरून परंपरागत हा व्यवसाय करत आहेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये अशी कुटुंबे दिसून येतात. सध्या माण तालुक्यातील वरकुटे येथील माणगंगा नदीकिनारी हा व्यवसाय करणारी काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. तर, लाकडाचा कोळसा करण्याच्या नादात आयुष्याचाच कोळसा झाला आहे, अशी खंत ते व्यक्त करत आहेत.

रायगड जिल्हातील सुधागड तालुक्यातून आलेली अनेक कुटुंबे गेल्या काही महिन्यांपासून सध्या वरकुटे येथील माणगंगा नदीकिनारी वास्तव्यास आहेत. काटेरी वनस्पती तोडून त्याच्या लाकडाची भट्टी लावून त्यापासून कोळसा तयार करून तो ठेकेदारांमार्फत विकण्याचे काम करीत आहेत.

हा व्यवसाय करणारे सुरेश वाघमारे व रोशन वाघमारे यांनी सांगितले की, या व्यवसायात आम्ही आमच्या वाडवडिलांपासून आहोत. गावागावांमध्ये फिरून तेथील काटेरी वनस्पती तोडून लाकडाची भट्टी लावून आम्ही कोळशाचे उत्पन्न घेतो. परंतु, आम्हाला केवळ पोटापुरतेच उत्पन्न मिळते. परंतु, आमच्या या व्यवसायात ठेकेदारी पद्धत वाढल्याने आम्हाला कोळशाच्या एका पोत्यामागे केवळ 150 रुपयेच मिळतात. गेल्या काही वर्षांपासून आम्ही हा दर घेत आहोत. त्यामध्ये मागणी करूनही वाढ मिळत नाही. आमच्या मागणीची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे मिळेल त्या उत्पन्नातून आम्हाला आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.

कोळसा तयार करण्यासाठी नदीकिनारी किंवा मोकळ्या जागेत वाढणाऱ्या काटेरी वनस्पती असलेल्या जागा शोधून, त्यांच्या मालकांना पैसे किंवा रान सरळ व पिकाऊ करून द्यावे लागते. यामध्ये होणारा खर्च आम्हालाच करावा लागतो. ठेकेदारामार्फत आम्ही तयार झालेला कोळसा विकतो. हाच कोळसा शहरांमधून उद्योगांसाठी व इतर कारणांसाठी मोठ्या किमतीला विकला जातो.

भट्टी लावल्यानंतर पावसामुळे किंवा अन्य कारणांनी ती विझू नये, याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आम्हाला भट्टी शेजारीच वास्तव्य करावे लागते. येथे टाकलेल्या पालातच आमचा संसार चालतो. सध्या आम्ही आई, वडील, पत्नी व लहान मुलांना घेऊन इथे राहत आहोत. भट्टीच्या वासामुळे कोणताही प्राणी, साप, विंचू फिरकत नाही. तसेच, आमच्याजवळ सोने, पैसा नसल्याने चोरांचीही भीती नसल्याची मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. कुटुंबातील मोठी मुले आश्रमशाळेत शिकतात. अन्यथा, गावाकडे आमच्या वयस्कर आजी, आजोबांकडे शिक्षणासाठी ठेवली जातात आणि लहान मुले आमच्याबरोबर राहतात.

आमच्या आई-वडिलांनी हाच व्यवसाय केला. आम्हाला शाळेत घातले नाही. पण आम्ही ती चूक करणार नाही. मुलांना शाळा शिकवणार. या व्यवसायात त्यांना आणणार नाही. पोटाची खळगी भरण्याच्या नादात आमच्या आयुष्याचा कोळसा झालाय, आता मुलांच्या आयुष्यात मात्र शिक्षणाची पहाट फुलवणार असल्याचेही वाघमारे बंधूनी सांगितले.

असा तयार होतो कोळसा

लाकडे तोडून त्याचे तुकडे करून त्याची भट्टी लावावी लागते. एका भट्टीपुरती लाकडे तोडून त्यांची खांडके करायला 20 ते 25 दिवस लागतात. त्यानंतर योग्य जागा निवडून भट्टी लावावी लागते. भट्टीतून कोळसा मिळायला आठवड्यापासून सुरुवात होते. एक भट्टी लावल्यापासून साधारणपणे एक महिनाभर चालते. त्यातून 100 ते 125 पोती कोळसा तयार होतो.