कौटुंबिक वाद विकोपाला गेला; सख्ख्या भावानंच काढला चार बहिणी आणि आईचा काटा

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनऊच्या हॉटेल शरणजीतमध्ये एका 24 वर्षीय मुलानेच आपल्या आईसह चार बहिणींची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुलाला अटक केली आहे.

लखनऊच्या हॉटेल शरणजीतमध्ये ही घटना घडली आहे. अरशद असे आरोपी मुलाचे नाव असून त्याने आपल्या आईसह चार बहिणींची हत्या केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या हत्येमागे कुटुंबातील अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे. हे कुटंब आगरा येथील रहिवासी आहे. ते नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लखनऊला आले होते. आगराच्या इस्लाम नगर येथील कुबेरपुर येथे राहणारा अरशद आपल्या आई आणि बहिणींसह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लखनऊ येथे आला होता. सर्वांनी चारबाग रेल्वे स्टेशनजवळील शरणजीत हॉटेलमध्ये रुम घेतली होती. रात्री नव्या वर्षाचे स्वागत केल्यानंतर अरशदने आईसह चारही बहिणींची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तत्काळ कारवाई सुरु केली. फिल्ड युनिटलाही बोलावले. मृतांमध्ये आई अस्मा आणि चार बहिणी आलिया (9), अल्शिया (19), अक्सा (16 ) आणि रहमीन (18) अशी नावे आहेत .

पोलिसांनी आरोपी अरशद याला अटक केली आहे. त्याने चौकशीत हत्या केल्याचे कबूल केले आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे, पोलीस अरशदची कसून चौकशी करत आहेत.  डीसीपी रवीना त्यागी यांनी सांगितले की, 1 जानेवारीला माहिती मिळाली की हॉटेल शरणजीतमध्ये एकाच कुटुंबातील पाच लोकांची हत्या करण्यात आली आहे. तत्काळ स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचून अरशद याला अटक केली. त्याने कौटुंबिक वादातून हत्या केल्याचे सांगितले आहे.