निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मिंधे गटाकडून शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात खोटा आणि चुकीच्या व्हिडीओ आणि पत्रकाचा वापर करण्यात आला. या विरोधात मतदारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. दरम्यान, या दोन्ही घटनांविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार महेश सावंत यांच्याविरोधात सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यात आली असून त्यांच्यावरील गुह्याविषयी अतिरंजित, खोटी माहिती देऊन त्यांची बदनामी करण्यात येत आहे. अशी माहिती देऊन मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे. निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानंतर पराभवाच्या भीतीने माहीममधील विरोधी उमेदवारांकडून असे प्रकार होत आहेत. याबाबत आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करून व्हिडीओ व्हायरल करणाऱया व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघात मिंध्यांच्या उमेदवाराला पराभवाची भीती असल्याने रडीचा डाव सुरू करण्यात आला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मागाठाण्याचे अधिकृत उमेदवार उदेश पाटेकर यांच्या नावाने बोगस माणूस उभा करून मिंध्यांना पाठिंबा देत असल्याची ‘फेक’ पत्रके मतदारसंघात वाटण्यात आली. ही गंभीर बाब लक्षात येताच शिवसेनेने पत्रके वाटणाऱया तरुणांना अडवून दहिसर, कस्तुरबा आणि समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिंध्यांच्या या कारस्थानामुळे मतदारसंघात निष्ठावंतांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.